…तरी गद्दारीचा शिक्का पुसला जाणार नाही : आदित्य ठाकरे

…तरी गद्दारीचा शिक्का पुसला जाणार नाही : आदित्य ठाकरे
Published on
Updated on

चिपळूण; पुढारी वृत्तसेवा : बाप चोरला, पक्ष चोरला आता तर हिंदुहृदयसम्राट पदवीही चोरली… हा तर कळस झाला; पण कितीही दिखावा केलात, तरी तुमच्या कपाळावरचा गद्दारीचा शिक्का पुसला जाणार नाही, असा घणाघात शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांनी चिपळूण येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर प्रसार माध्यमांशी बोलताना केला.

आदित्य ठाकरे अंगण बैठकीत बोलताना म्हणाले, खोके सरकारचे हे शेवटचे अधिवेशन आहे. यानंतर केंद्रात आणि राज्यात परिवर्तन होणार आहे. या सरकारने नुसते पंचनामे करण्याचे काम केले. कोणत्याही शेतकर्‍याला शासनाची मदत पोहोचलेली नाही. त्यामुळे शेतकरी वार्‍यावर सोडण्यात आला आहे. त्याच पद्धतीने येथील उद्योगही बाहेरच्या राज्यात जात आहेत. वर्ल्ड कपची मॅचही गुजरातला घेऊन गेले. आ. भास्कर जाधव यांच्या सुवर्ण-भास्कर निवासस्थानी ही बैठक झाली.

कोकण पदवीधर विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे कोकण दौर्‍यावर आहेत. आज सकाळी त्यांनी खेड, चिपळूणचा दौरा केला. बहादूरशेख चौकात त्यांचे युवा कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले. यानंतर मोटारसायकल रॅलीने ते उत्तर रत्नागिरी जिल्हाप्रमुख सचिन कदम यांच्या निवासस्थानी
आले. या नंतर ठिकठिकाणी स्वागत स्वीकारून आ. भास्कर जाधव यांच्या अंगणात ही बैठक झाली.

यावेळी व्यासपीठावर शिवसेना सचिव खा. विनायक राऊत, आ. भास्कर जाधव, आ. राजन साळवी, आ. सुनील शिंदे, माजी आ. रवींद्र माने, सुभाष बने, माजी जि. प. अध्यक्ष विक्रांत जाधव, रोहन बने, जिल्हाप्रमुख सचिन कदम, उपजिल्हाप्रमुख प्रताप शिंदे, क्षेत्रप्रमुख बाळा कदम, राजेंद्र महाडिक, सुनील शिंदे, विजय कदम, तालुकाप्रमुख विनोद झगडे, सुरेश कदम, पप्पू आंब्रे, रवींद्र सुर्वे, सर्व तालुकाप्रमुख, शहरप्रमुख, महिला पदाधिकारी उपस्थित होते.

या बैठकीची प्रस्तावना आ. भास्कर जाधव यांनी केली. ते म्हणाले, आज अनेक ठिकाणी फिरताना शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांची लोक आठवण काढतात. या खळा बैठकीचे महत्त्व वेगळे आहे. बाळासाहेब ठाकरेंनीदेखील अशाच पद्धतीने पक्ष बांधणीला सुरुवात केली होती. त्यामुळे आता उद्याचे नेतृत्व म्हणून आदित्य ठाकरे आहेत. आज म्हणूनच सर्व पक्ष आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करतात. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाच्या काळात केलेले काम आज विरोधकांना टोचत आहे. त्यामुळे त्यांच्यावरही टीका होत आहे. ज्यावेळी विरोधकांनी उद्धव ठाकरेंना घेरले त्यावेळी तुम्ही आपल्या वडिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलात. यामुळे आपल्याला अभिमान वाटतो, असे आ. भास्कर जाधव यांनी यावेळी सांगितले. त्यांच्यावर पुलाचे उद्घाटन केले म्हणून खोटी केस दाखल केली. जनतेसाठी त्यांनी ते उद्घाटन केले. यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, स्वर्गामध्ये असलेल्या आजोबांना आज आनंद झाला, असे त्यांनी सांगितले.

यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आदित्य ठाकरे म्हणाले, ही घरगुती बैठक आहे, ही अंगणातली बैठक़ आहे. निवडणुकीत मोठ्या मैदानात, सभागृहात सभा होतील. परंतु पदाधिकारी व घरच्या लोकांशी बोलायचे होते, म्हूणन ही खळा बैठक आयोजित केली. इतर निवडणुकांबरोबरच कोकण पदवीधरची निवडणूक देखील महत्त्वाची आहे.

गत निवडणुकीत शिवसेना अल्प मतांनी पराभूत झाली होती. त्यावेळी चांगली तयारी झाली नव्हती. मात्र, यावेळी आमचे नेते उद्धव ठाकरे यांनी चांगली तयारी करून कामाला लागलो आहोत. मुंबई आणि कोकण हे समिकरण झाले आहे. त्यामुळे जास्तीत जास्त पदवीधर लोकांना आणि आपल्याला समर्थन देणार्‍यांना सभासद करून घ्या. उच्चशिक्षित पदवीधर तरूण शिवसेनेच्या बाजूने आहे. कारण आज या पदवीधरांना नोकर्‍या नाहीत, ते बेरोजगार आहेत, नवे उद्योग येत नाहीत. ते परराज्यात जात आहेत. शेतकर्‍यांना साधा विमा मिळत नाही. त्यांचे नुसते पंचनामे करण्यात येतात. त्यामुळे हे सरकार पंचनामे करण्यापुरतेच आहे. त्यामुळे आज अनेक शेतकरी सांगतात की, ठाकरे सरकारनेच शेतकर्‍यांना मदत दिली' हा अनुभव आपण घेतला आहे. पुढच्या दहा दिवसांत जास्तीत जास्त पदवीधर मतदार नोंदणी करा आणि त्याचा अहवाल पाठवा, असे आवाहन यावेळी आदित्य ठाकरे यांनी केले.

देशभरासह महाराष्ट्रात एक विरोधी वातावरण आहे. उद्धव ठाकरे यांच्याबाबत प्रेमाचे वातावरण निर्माण झाले आहे. महाविकास आघाडी म्हणून आपण 2024 ची निवडणूक जिंकणार. हे आपले वर्ष आहे. त्यासाठी मेहनत घ्यायला हवी. बैठकीचे सूत्रसंचालन खा. विनायक राऊत यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news