रत्नागिरी : सीईओंच्या खूर्चीवर बसून शिक्षिकेचे फोटोशूट | पुढारी

रत्नागिरी : सीईओंच्या खूर्चीवर बसून शिक्षिकेचे फोटोशूट

दीपक कुवळेकर

रत्नागिरी : खुर्चीचा मोह अनेकांना आवरत नाही. खुर्चीसाठी फक्त राजकीय नेतेच नव्हे तर अनेकजण आटापिटा करत असतात. सध्या जि. प. भवनात खुर्चीचा गमतीदार किस्सा चर्चेत आला आहे. जिल्हा परिषदेतील मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या खुर्चीवर बसून एका शिक्षिकेने चक्क फोटो शूट केल्याची चर्चा सध्या रंगली आहे.

खुर्ची आणि राजकारण यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे नाते आहे. सत्तेच्या खुर्चीत बसण्यासाठी नेत्यांमध्ये चढाओढ असते. त्यासाठी ते वाट्टेल ते करत असतात. हे गेले काही दिवसात राज्याच्या राजकारणावरून दिसून आले आहे. खूर्चीचा मोह काही सामान्यांनाही असल्याच्या घटना पहावयास मिळत आहेत. जिल्हा परिषदेमध्ये सध्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांच्या खुर्चीचा विषय गाजत आहे.

इस्रो व नासाला जाण्यासाठी विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊन त्यांची नुकतीच निवड जाहीर करण्यात आली आहे. यासाठी शनिवारी शिक्षक व विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद भवनात बोलावण्यात आले होते. मात्र या दिवशी जिल्हा परिषदेला सुट्टी असल्याने सर्व विद्यार्थी व शिक्षकांना व्हीडिओ कॉन्फरन्स हॉलमध्ये बसवण्यात आले होते. मात्र यावेळी उपस्थित एक शिक्षिका हॉलमधील मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांच्या खुर्चीवर जाऊन बसली. यानंतर तिने काही फोटोही काढले. ही गोष्ट उपस्थित असलेल्या शिपाई यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी संबंधित शिक्षिकेची कानउघाडणी केली. त्यानंतर हे फोटो डिलिट करण्यासाठी सांगितले. त्यानुसार ते फोटो डिलिट झाले. अशी चर्चा सध्या जि. प. भवनात व शिक्षकवर्गात सुरू आहे. जर प्रशासनाने सीसीटीव्ही फुटेज तपासले तर नक्कीच या शिक्षिकेवर कारवाई होईल, अशी चर्चा सध्या सुरू आहे.

काही दिवसापूर्वी रंगला होता संगीत खुर्चीचा खेळ

जिल्हा परिषदेमध्ये काही दिवसांपूर्वी शिक्षणाधिकार्‍यांच्या खुर्चीचा खेळ रंगला होता. दर महिन्याला शिक्षणाधिकारी पदाचा पदभार बदलला जात होता. तीन महिन्यात तीन अधिकारी बदलले होते. सध्या दीड महिना मात्र ही खुर्ची स्थिर राहिली आहे.

Back to top button