रत्नागिरी : पनवेलजवळ मालगाडी घसरुन विस्कळीत झालेले कोकण रेल्वेचे वेळात्रक सलग तिसऱ्या दिवशी कोलमडलेलेच होते. मुंबईतून मडगावकडे येणारी कोकणकन्या एक्स्प्रेस एक नव्हे दोन नव्हे तर सुमारे सात तास उशिराने धावत होती. या मार्गावरुन इतरही अनेक गाड्या विलंबानेच धावत होत्या. अपघातामुळे बिघडलेले हे वेळापत्रक सुरळीत होण्यास एक दोन दिवस लागतील, असा अंदाज आहे.
शनिवारी दुपारी पनवेल कळंबोलीजवळ भरलेली मालगाडी घसरल्याने मध्य तसेच कोकण रेल्वेची वाहतूक पार कोलमडली. दरम्यान, शनिवारच्या अपघातामुळे ठप्प पडलेली वाहतूक २८ तासांनी रविवारी सायंकाळी ७ वाजून ३५ मिनिटांनी सुरळीत झाली. मात्र, असे असले तरी रेल्वेची वाहतूक पूर्णपणे पूर्वपदावर आलेली नाही.
मुंबईतील अपघातामुळे कोकण रेल्वे मार्गावरील नागपूर- मडगाव विशेष गाडी ५ तास २६ मिनिटे, खेड-पनवेल मेमू स्पेशन २ तास ३१ मिनिटे, मडगाव-मुंबई मांडवी एक्स्प्रेस १ तास १६ मिनिटे, सावंतवाडी – दिवा एक्स्प्रेस २ तास २० मिनिटे, मडगाव मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस १ तास, मुंबई सीएसएमटी- मडगाव कोकणकन्या एक्स्प्रेस ६ तास ५६ मिनिटे उशिराने धावत होती