

चिपळूण : तालुक्यातील वालोपे गणेशवाडी येथे गुरुवारी सायंकाळी वाशिष्ठी नदीच्या घाटावर अंगावर शहारे आणणारी घटना घडली. कपडे धुण्यासाठी नदीवर गेलेल्या नंदिनी भुपेंद्र पवार (वय ३५) यांच्यावर पाण्यात दबा धरून बसलेल्या मगरीने अचानक हल्ला केला. मगरीने त्यांचा पाय जबड्यात पकडून त्यांना खोल पाण्यात ओढण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रसंगावधान राखत नंदिनी यांनी काठावरील दगड घट्ट पकडून ठेवला. दरम्यान, आईचा जीव धोक्यात असल्याचे पाहून त्यांच्या अवघ्या १० वर्षांच्या मुलीने धाडसाने आईचा हात पकडून तिला पाण्याबाहेर खेचले. लेकीच्या या धाडसामुळे नंदिनी यांचा जीव थोडक्यात बचावला.
नंदिनी पवार या सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास आपली मुलगी स्वर्णी हिच्यासोबत वाशिष्ठी नदीच्या घाटावर कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. त्या कपडे धुत असतानाच पाण्यात दबा धरून बसलेल्या अजस्त्र मगरीने अचानक त्यांच्यावर झडप घातली. क्षणार्धात मगरीने नंदिनी यांच्या पायाला जबड्यात पकडले आणि त्यांना पाण्यात ओढण्यास सुरुवात केली.
अचानक झालेल्या हल्ल्यामुळे नंदिनी यांनी आरडाओरड केली. मात्र, त्यांनी प्रसंगावधान राखत काठावरील मोठा दगड घट्ट पकडून ठेवला. त्यामुळे मगर त्यांना खोल पाण्यात ओढून नेऊ शकली नाही. आईला मगरीने ओढल्याचे पाहून स्वर्णी घाबरून न जाता तातडीने आईच्या मदतीला धावली. तिने आईचा हात घट्ट पकडून आपल्या परीने सर्व शक्ती पणाला लावत तिला पाण्याबाहेर खेचले. या धाडसी प्रयत्नामुळे नंदिनी यांची मगरीच्या तावडीतून सुटका झाली. मगरीच्या हल्ल्यात नंदिनी यांच्या पायाला दुखापत झाली असून त्यांना तातडीने कामथे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
वनविभागाची तातडीने घटनास्थळी धाव
घटनेची माहिती मिळताच चिपळूणचे वनपरिक्षेत्र अधिकारी सरवर खान यांनी तातडीने हालचाली सुरू केल्या. वनपाल एस. एस. सावंत, वनरक्षक के. डी. इरमले (कोळकेवाडी), वनरक्षक रा. भा. गुंटे (रामपूर), लिपिक एस. ए. कलावंत आणि आर.आर.टी. सदस्य अथर्व घाग यांच्यासह वनविभागाच्या पथकाने कामथे रुग्णालयात धाव घेतली. वन अधिकाऱ्यांनी जखमी नंदिनी पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस करून त्यांना धीर दिला. तसेच वनविभागाकडून आवश्यक ती मदत केली जाईल, असे आश्वासन दिले.
नदीकाठी जाणाऱ्यांना वनविभागाचा गंभीर इशारा
या घटनेनंतर वनविभागाने नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. पावसाळ्यात वाशिष्ठी नदीमध्ये मगरींचा वावर वाढलेला असण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी नदीत पोहणे, कपडे किंवा जनावरे धुण्यासाठी पाण्यात उतरणे टाळावे. तसेच लहान मुलांना कोणत्याही परिस्थितीत नदीकिनारी किंवा नदीच्या पाण्यात जाऊ देऊ नये, असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी सरवर खान यांनी केले आहे. दरम्यान, जीवाची पर्वा न करता संकटाच्या क्षणी आईला वाचविणाऱ्या १० वर्षीय स्वर्णीच्या धाडसाची चर्चा सुरू आहे