

देवरुख : शहरातील डाक कार्यालय सध्या पहिल्या मजल्यावर असून अरुंद जिना व उंच पायऱ्यांमुळे ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी, दिव्यांग बांधव तसेच आजारी व अशक्त नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. नागरिकांची ही समस्या लक्षात घेऊन क्रांती व्यापारी संघटनेने पर्यायी जागा शोधण्यासाठी डाक विभागाकडे मागणी केली आहे.
क्रांती व्यापारी संघटनेतर्फे रत्नागिरी विभाग डाक अधीक्षक यांच्याशी पत्रव्यवहार करण्यात आल्यानंतर डाक विभागाने सकारात्मक प्रतिसाद देत दोन पत्रांद्वारे देवरुख परिसरातील इतर शासकीय आस्थापनांमध्ये डाक कार्यालयासाठी आवश्यक असलेली सुमारे १५०० चौ. फूट जागा उपलब्ध करून घेण्यासाठी केलेल्या कार्यवाहीची माहिती संघटनेला दिली. मात्र शासकीय आस्थापनांमध्ये आवश्यक जागा उपलब्ध होत नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आता खासगी जागांचा पर्याय तपासण्यात यावा, अशी मागणी क्रांती व्यापारी संघटनेने डाक विभागाकडे केली आहे. यासाठी संघटनेने स्थानिक पातळीवर काही संभाव्य जागांचे पर्यायही सुचविले आहेत. या जागांची डाक विभागाने प्रत्यक्ष पाहणी करून त्या डाक कार्यालयाच्या आवश्यक निकषांनुसार योग्य असल्यास संबंधित व्यवस्थापन अथवा जागामालकांशी संपर्क साधावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
देवरुख हे तालुक्याचे प्रमुख व्यापारी व प्रशासकीय केंद्र असून परिसरातील मोठ्या संख्येने नागरिक विविध डाक सेवांसाठी देवरुख डाक कार्यालयावर अवलंबून आहेत. त्यामुळे डाक कार्यालयासाठी भूतलावर सहज प्रवेश करता येईल अशी प्रशस्त, सुरक्षित व नागरिकांच्या सोयीची जागा उपलब्ध होणे आवश्यक असल्याचे संघटनेने म्हटले आहे. दिलेले पर्याय उपलब्ध नसल्यास देवरुख शहरातील इतर खासगी इमारती व व्यावसायिक आस्थापनांमध्ये सुमारे १५०० चौ. फूट जागेचा शोध घेऊन ती भाडेतत्त्वावर घेण्याची प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
शासकीय जागा उपलब्ध नाही म्हणून नागरिकांची गैरसोय कायम राहू नये. डाक विभागाने खासगी जागांचा पर्याय तपासून नागरिकांना सुलभ व सुरक्षित डाक सेवा उपलब्ध करून द्यावी, अशी भूमिका क्रांती व्यापारी संघटनेने मांडली आहे. या संपूर्ण पाठपुराव्यामध्ये क्रांती व्यापारी संघटनेचे निखिल कोळवणकर, इस्तीयाक कापडी, नितीन हेगशेट्ये, अण्णा बेर्डे, भैया जागुष्टे, संदीप वेल्हाळ, आकाश भोपळे, साई कामेरकर, बावा भुवड तसेच सर्व पदाधिकारी आणि मार्गदर्शक म्हणून सामाजिक कार्यकर्ते कृष्ण कुमार भोसले यांचे मोलाचे सहकार्य लाभले, अशी माहिती संघटनेतर्फे देण्यात आली.