

राजापूर, पुढारी वृत्तसेवा : राजापूर, लांजा व साखरपा विधानसभा मतदारसंघात शिवसेना (ठाकरे गट) उपनेते राजन साळवींच्या नेतृत्वाखाली अपेक्षेप्रमाणे दणदणीत यश मिळवले. राजापूर विधानसभा मतदार संघातील एकूण ५३ ग्रामपंचायतींपैकी ३५ ग्रामपंचायतींवर सत्ता मिळवली तर उर्वरीत १८ ठिकाणी गाव पॅनल ,काँग्रेस ,राष्ट्रवादी व भाजपने आपल्या जागा जिंकल्या आहेत.
लोकसभा, विधानसभा, पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या प्रत्येक निवडणुकीत शिवसेनेने राजपूर मतदारसंघात आपले वर्चस्व सिद्ध करीत हा राजापूर हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याचे सिद्ध केले आहे. राजापूर तालुक्यात एकुण ३१ ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले होते. याठिकाणी शिवसेना (ठाकरे गटाने) १७ , भाजप ३, गाव पॅनल ४,काँग्रेस ३, मनसे १, राष्ट्रवादी १ व शिंदे गट २ ग्रामपंचायतींवर विजय मिळवला आहे. लांजा तालुक्यामध्ये तर शिवसेनेने (ठाकरे गट) एकुण १९ ग्राम पंचायतींपैकी १५ ठिकाणी शिवसेनेचे पॅनल उभे केले होते. यातील २ ठिकाणी गाव पॅनेल तर २ ठिकाणी भाजपा विजयी झाले आहे.
राजापूर विधानसभा मतदारसंघाचे सर्वेसर्वा आमदार डॉ.राजन साळवी यांनी हा अपेक्षित विजय मतदाराच्या विचाराचा, शिव सैनिकांचा व शिवसेनेच्या विकासकामांचा असल्याचे सांगून शिवसेना जिल्हाप्रमुख विलास चाळके,उपजिल्हाप्रमुख जगदीश राजापकार, शिवसेनेचे तालुकाप्रमुख संदीप दळवी,प्रकाश कुवळेकर,विधानसभा क्षेत्रप्रमुख जया माने,सर्व उप तालुकाप्रमुख, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख,शाखाप्रमुख, गटप्रमुख,बूथप्रमुख, महिलाआघाडी, युवासेना, पं.स.सभापती, सदस्य, जि.प.सदस्य तसेच शिवसैनिकांच्या अपार मेहनतीमुळे मिळाला असल्याची प्रतिक्रिया दिली.