रायगड : पेण तालुक्यात पूरसदृश परिस्थिती, १७८ नागरिकांचे स्थलांतर

रायगड : पेण तालुक्यात पूरसदृश परिस्थिती, १७८ नागरिकांचे स्थलांतर

पेण, पुढारी वृत्तसेवा : पेण तालुक्यात मागील ४८ तासात सलग मुसळधार पाऊस पडत असून या मुसळधार पावसामुळे पेणमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. बुधवारी (दि.१९) दिवसभरात पेण तालुक्यात २३५ मिमी इतका पाऊस पडल्याने तालुक्यातील अनेक गावांना पुराचा वेढा बसला आहे. तालुक्यातील बाळगंगा, भोगावती आणि निगडे नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून शहापाडा धरण देखील ओव्हरफ्लो होऊन वाहू लागला आहे. पेण तालुक्यातील अंतोरे, खरोशी, दुरशेत, जिते, तांबडशेत, जोहे, दादर, कळवे, शिर्की, निफाड, जावळी, निधवली आदी ठिकाणी मोठया प्रमाणात पावसाचे पाणी भरले असून पेण आपत्ती व्यवस्थापन समितीने या सर्व गोष्टींकडे लक्ष केंद्रीत केले आहे.

नदी काठच्या तसेच धरण क्षेत्रातील गावांमधील नागरिकांना सतर्क राहून वेळ आल्यास स्थलांतराच्या तयारीत राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. रात्रभर पडत असणाऱ्या या मुसळधार पावसामुळे पेण शहरात देखील अनेक ठिकाणी पाणी भरले असून जिल्हा प्रशासनाने देखील सर्वच शाळांसह महाविद्यालयांना देखील सुट्टी जाहीर केली आहे. संपूर्ण रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असून या पावसामुळे अनेक ठिकाणचे मार्ग बंद झाले असल्याने एसटी महामंडळाने पेण, पाली, नागोठणे, महाड, कर्जत, अलिबाग अशा ठिकाणच्या अनेक एसटी बसेस बंद ठेवण्याचा निर्णय रायगड एसटी महामंडळाने घेतला आहे. आजच्या झालेल्या पावसामुळे जिते, चुनाभट्टी येथील ३९ कुटुंबातील १७५ जणांचे स्थलांतर झाले आहे तर खरोशी येथील दोन आणि महलमिऱ्या डोंगर येथील एक अशा तीन घरांचे अंशतः नुकसान झाले आहे.

गणपती कारखानदारचेही नुकसान

पेण तालुक्यातील रावे, दादर, उरणोली, दुरशेत, खरोशी मार्गांवर पाणी भरल्याने या मार्गांवरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. पेण तालुक्यातील हमरापूर ,जोहे, तांबडशेत, दादर येथील अनेक कारखानदार यांच्या कार्यशाळेत पावसाचे पाणी चारी बाजूने चढल्याने दोन ते तीन फुटापर्यंत च्या जमिनीवर ठेवलेल्या मूर्ती भिजल्या आहेत. पेण शहरातील मच्छिमार्केट, कवंडाळ तलाव परिसरात पावसाचे पाणी रस्त्यावरही दोन ते तीन फूट आले होते.

हेही वाचलंत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news