Lok sabha Election 2024 Results : राणे साहेब अंगार है… बाकी सब भंगार है ! कुडाळात कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष

Lok sabha Election 2024 Results : राणे साहेब अंगार है… बाकी सब भंगार है ! कुडाळात कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष

कुडाळ, पुढारी वृत्तसेवा : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ निवडणुकीत महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या विजयाचा आनंद कुडाळ शहरात मंगळवारी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून तसेच लाडू, जिलेबी वाटत साजरा केला. कुडाळात रस्त्या- रस्त्यावर महायुतीच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला. दरम्यान कुडाळ येथील शिवसेना ठाकरे गटाच्या शाखेसमोरही भाजप कार्यकर्त्यांनी फटाके फोडले. ' राणे साहेब अंगार है, बाकी सब भंगार है, हम से जो टकराएगा मिट्टी मे मिल जाएगा!' अशी जोरदार घाषणाबाजी करीत ठाकरे गटाला डिवचण्याचा प्रयत्न केला.

रत्नागिरी – सिंधुदुर्ग मतदारसंघात भाजपचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय मंत्री नारायण राणे हे महायुतीकडून निवडणूक रिंगणात उतरले होते. तर त्यांच्या विरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे विद्यमान खा.विनायक राऊत मविआचे उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरले होते. दोन्ही बाजूंकडून ही निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आली होती. आपापल्या उमेदवारांसाठी दोन्ही महायुती आणि इंडिया-महाविकास आघाडीच्या दिग्गज नेत्यांच्या प्रचारसभाही झाल्या होत्या.

त्यामुळे रत्नागिरी-सिंधुदुर्गसह संपूर्ण राज्याचे लक्ष या लढतीकडे लागले होते. रत्नागिरी येथे मंगळवारी सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर सर्वांचे लक्ष या मतमोजणीकडे लागले होते. काही फेर्‍यात श्री.राऊत आघाडीवर होते तर त्यानंतर श्री.राणे यांनी मतांमध्ये मोठी आघाडी घेतली. दुपारी दीड वाजताच्या सुमारास महायुतीचे उमेदवार श्री.राणे यांनी चाळीस हजारांहून अधिक मतांची आघाडी घेत विजयाच्या दिशेने वाटचाल केली. त्यानंतर भाजप – शिंदे शिवसेना महायुतीच्या कार्यकर्त्यांनी येथील भाजप कार्यालयासमोर एकवटत जोरदार शक्तिप्रदर्शन करीत विजयाचा जल्लोष सुरू केला.

भाजप कार्यालयासमोर फटाके फोडून जल्लोष करण्यात आला. त्यानंतर माठेवाडा रस्त्यावर फटाके फोडत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. गीता हॉटेलसमोर मुख्य रस्त्यावर फटाके फोडत, थेट शिवसेना ठाकरे गटाच्या शाखेपर्यंत पेटत्या फटाक्यांची माळ ओढत नेऊन फटाके फोडण्यात आले. तेथेही कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर गांधीचौक येथे मुख्य चौकात लाडू, जिलेबी वाटत तसेच फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. येऊन येऊन येणार कोण राणे साहेबांशिवाय आहे कोण, महायुतीचा विजय असो, मोदी साहेबांचा विजय असो, राणे साहेबांचा विजय असो, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचा विजय असो, निलेश राणे यांचा विजय असो, अशी जोरदार घोषणाबाजी कार्यकर्त्यांकडून करण्यात आली.

शिवसेना (शिंदे गट) महिला आघाडी जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर, माजी नगराध्यक्ष ओंकार तेली, भाजपाच्या नगरसेविका सौ.प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर, नगरसेवक निलेश परब, नगरसेवक अ‍ॅड.राजीव कुडाळकर, नगरसेवक गणेश भोगटे, माजी सरपंच प्रशांत राणे, निलेश तेंडोलकर, माजी पं. स. सदस्य संदेश नाईक, बाळा पावसकर, विजय वारंग, राकेश कांदे, रोहीत भोगटे, मयूर कुडतरकर, संजय कोरगांवकर, बांवचे शक्तिकेंद्र प्रमुख नागेश परब आदींसह महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

भाजप – शिवसेना ठाकरे गट कार्यालयात पोलिस बंदोबस्त

लोकसभा निवडणूक मतमोजणी पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने सतर्क राहत, कोणतीही अनुचित घटना घडू नये, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावा यादृष्टीने खबरदारी घेतली होती. त्यानुसार येथील भाजप कार्यालय तसेच शिवसेना ठाकरे गटाच्या शाखे जवळ मंगळवारी दिवसभर पोलिस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता.

पदाधिकारी व कार्यकर्ते रत्नागिरीत

या लोकसभा निकालासाठी कुडाळसह सिंधुदुर्गातील महायुती तसेच इंडिया-महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने रत्नागिरी येथे रवाना झाले होते. यातील काहीजण सोमवारी रात्री तर काहीजण मंगळवारी पहाटेच रत्नागिरीत निकाल ऐकण्यासाठी गेले होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news