

कणकवली, पुढारी वृत्तसेवा : रेल्वेच्या गडनदी पुलाखाली गांजा विक्री आणि सेवन करणार्या दोघांना स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. तर या दोघांचा अन्य एक साथीदार अंधाराचा फायदा घेऊन घटनास्थळावरून पसार झाला होता. त्याला बुधवारी दुपारी कणकवली पोलिसांनी बाजारपेठेत फिरत असताना ताब्यात घेतले. वैभव सीताराम पांगम (वय 25), स्वप्निल सुरेश कुडतरकर (30), रामदास तुकाराम पांगम (तिघेही रा. नाटळ) अशी या संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून 39 हजार रु. किमतीचा 1 किलो 310 ग्रॅमचा गांजा, एक मोटारसायकल, 2 मोबाईल, दोन चिलीम, वजनकाटा, रोख रक्कम जप्त करण्यात आला. ही कारवाई मंगळवारी रात्री 11.30 ते बुधवारी पहाटे 3 वा. च्या सुमारास करण्यात आली. तिघांनाही न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक संदीप भोसले यांना काही तरुण गांजा सेवन व विक्री करत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार शहरात गस्त सुरू केली होती. मंगळवारी रात्री 11.30वा. च्या सुमारास नाथ पै नगर येथील रोडवर तीन तरुण मोटरसायकल थांबून चालत रेल्वे ब्रिजखाली गेले. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाला त्यांच्या हालचालीचा संशय आल्याने त्यांनी तिथे जाऊन पाहिले. त्यावेळी त्यातील एक तरुण अंधाराचा फायदा घेत पसार झाला. तर अन्य दोघांना रंगेहात पकडण्यात आले.
त्या दोघांची चौकशी केली असता त्यांनी आपल्याजवळ गांजा असल्याची कबुली दिली.त्यांच्याकडून 1 किलो 310 ग्रॅमचा 39 हजार रुपयांचा गांजा, 50 हजाराची एक मोटरसायकल, 8 हजार किंमतीचे 2 मोबाईल, दोन चिलीम, वजनकाटा व रोख 700 रुपये जप्त करण्यात आले आहेत. संशयितांना ताब्यात घेऊन कणकवली पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. दरम्यान पळालेल्या तिसर्या संशयिताला पोलिसांनी बुधवारी कणकवली बाजारपेठेत फिरत असताना ताब्यात घेतले.
ही कारवाई स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक संदीप भोसले, पोलिस उपनिरीक्षक आर. बी. शेळके, पोलिस हवालदार राजू जामसंडेकर, गुरू कोयंडे, श्री. गंगावणे, श्री.देसाई, श्री. कदम, कृष्णा केसरकर यांनी केली.दोन्ही संशयितांविरोधात कणकवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास कणकवली पोलिस उपनिरीक्षक बापू खरात करत आहेत.
सिंधुदुर्गात गांजा विक्रीच्या प्रकारात वाढ
गुटखा आणि गोवा बनावट दारु विक्रीचे सिंधुदुर्गात अवैध धंदे सुरू असतानाच आता त्यात गांजा विक्रीचीही भर पडली आहे. शहरासह ग्रामीण भागातही बिनदिक्कतपणे गांजा विक्री होवू लागली आहे. यामुळे तरुण पिढी अंमली पदार्थाच्या नशेखाली जावू लागली आहे. त्यामुळे पोलिस यंत्रणेने या अंमली पदार्थांच्या अवैध धंद्यांची पाळेमुळे शोधून दोषींवर कडक कारवाई करणे आवश्यक आहे. मुळात सिंधुदुर्गात हा गांजा येतो कुठून? त्याचे सुत्रधार कोण? याचा सखोल तपास करण्याची गरज आहे.