

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : मोचा चक्रीवादळ बरंच दूर असलं तरीही कोकण किनारपट्टीवर त्याचे परिणाम दिसून येणार असून विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. गोंदिया, गडचिरोलीलाही अवकाळीचा तडाखा बसणार आहे. दि. ११ मे पर्यंत बंगालच्या उपसागरात उत्तर वायव्येकडून चक्रीवादळ पुढे सरकेल यावेळी वाऱ्याचा वेग ताशी १२० कि.मी. इतका असेल. त्यामुळे किनारपट्टी भागातही सोसाट्याचा वारा आणि खवळलेला समुद्र अशीच परिस्थितीची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. मोचा चक्रीवादळाचा प्रभाव दि. १२ मेपर्यंत राहणार असली तरी कोकण किनारपट्टी भागात अवकाळीचे सत्र सुरूच राहणार आहे.
दरम्यान, बुधवारी सकाळी हलक्या पावसाच्या सरींनी हजेरी लावली होती. मंगळवारी रात्रीही रत्नागिरी जिल्ह्याच्या बहुतांश भागात जोरदार पाऊस झाला. पावसाचा जोर बुधवारी कमी होता. सकाळी काही भागात जोरदार सरी झाल्या. संगमेश्वर, चिपळूण , दापोलीसह गुहागर तालुक्यातही पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर मात्र हवमान कोरडे झाले. तरी मळभी वातावरणाचा खेल टप्प्याटप्प्याने सुरूच होता. मोचा चक्रीवादळ उत्तर अंदमानच्या दिशेने पुढे सरकणार असून त्याचा प्रभाव कोकण किनारपट्टीवर फारसा जाणणार नसल्याचा दिलासा हवामान विभागाने दिला आहे. मात्र, अवकाळीचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मोचाचा प्रवास दि. १२ ते १४ मे पर्यंत सुरु राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दि. १२ मे पर्यंत हे वादळ उत्तर पश्चिम दिशेला पुढे सरकणार आहे. त्या नंतर चक्रीवादळ अतिरौद्र रुप धारण करत ओडिशाचा उत्तर भाग आणि पश्चिम बंगालचा किनारपट्टी भाग प्रभावित होणार असून, या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसासोबतच सोसाट्याचे वारे वाहणार असल्याचाही इशारा देण्यात आला आहे.
या चक्रीवादळाचा थेट परिणाम होणार नसला तरीही ढगाळ वातावरण आणि अवकाळीचं सावट मात्र कायम राहणार आहे. शिवाय वादळ जसजसं पुढे सरकेल तसतसं देशाच्या दक्षिण किनारपट्टी भागावर याचे परिणाम दिसू लागणार आहेत. परिणामी बुधवारपासून अंदमान-निकोबार बेट समुहामध्ये मुसधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शिवाय दक्षिण पूर्व बंगालचा उपसागर आणि अंदमानला लागून असणाऱ्या किनारपट्टी भागासह इतर राज्यांना लागून असणारा समुद्रही खवळलेला असेल. ज्यामुळं मासेमार आणि लहान जहाजांना समुद्रातन न जाण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
या वादळाचा मान्सूनवर थेट परिणाम होणार नसून, फक्त वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आयएमडीकडून वर्तविण्यात आली आहे. मोचाचा प्रभाव किनारपट्टी भागात राहणार असून या कालावधीत सोसाट्याचा वारा आणि समुद्र खवळलेला राहिल. त्यामुळे किनारी भागात सावधगिरी आणि सजत्तेच्या सूचना सर्व जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत.