सातार्‍यात सहा नवी नागरी आरोग्य केंद्रे | पुढारी

सातार्‍यात सहा नवी नागरी आरोग्य केंद्रे

सातारा; पुढारी वृत्तसेवा : सातार्‍यात शाहूनगर, तामजाईनगर, शाहूपुरी, पीरवाडी, करंजे, लक्ष्मीटेकडी या ठिकाणी नवी 6 नागरी आरोग्य केंद्रे मंजूर झाली आहेत. या आरोग्य केंद्रांसाठी मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्याकडून जागेची पाहणी करण्यात आली असून, त्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेला सादर करण्यात येणार आहे. हद्दवाढ भागात निर्माण झालेल्या केंद्रांमुळे शहरवासीयांना दिलासा मिळणार आहे.

सातारा शहरातील वाढत्या लोकसंख्येमुळे नागरिकांचे स्वास्थ्य आणि आरोग्य महत्त्वाचे आहे. सातारा नगरपालिकेच्या प्रयत्नातून राजवाडा येथे पूज्य कस्तुरबा आणि गोडोलीतील श्री. छत्रपती प्रतापसिंह महाराज नागरी आरोग्य केंद्र सुरू आहे. शहराचा विस्तार झाल्यामुळे तसेच परिसरातील ग्रामीण भागातील नागरिकांनाही ही केंद्रे नजीक असल्यामुळे या दोन्ही नागरी आरोग्य केंद्रांतील आरोग्य सेवेंवर नेहमीच ताण राहिला आहे. कोरोना संसर्ग काळात ही दोन्ही नागरी आरोग्य केंद्रे सातारकरांसाठी तारणहार ठरली. विविध आरोग्य सर्व्हे यांच्यासोबतच लसीकरणासाठी दोन्ही केंद्रांवरील कर्मचार्‍यांनी प्रचंड मेहनत घेतली.

लाखावर लोकसंख्या असलेल्या शहरात आरोग्य सेवेची घडी विस्कटू दिली नाही. सातारा शहरातील अंतर्गत भाग तसेच झोपडपट्टी परिसरातही लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. साथीच्या रोगांत वेळावेळी अ‍ॅबेटिंग करण्याचे काम या केंद्रांच्या आरोग्य पथकांनी केले. आता शहराची हद्दवाढ झाल्यामुळे आणखी लोकसंख्येत भर पडली आहे. त्यामुळे हद्दवाढ भागात आरोग्य सेवा देणे आवश्यक होते. त्यासाठी सातारा नगरपालिकेने सहा महिन्यांपूर्वी प्रस्ताव तयार करून शासनास सादर केला होता. त्यानुसार सातार्‍यात 6 नागरी आरोग्य केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे.

या नागरी आरोग्य केंद्रांना राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत 2021-22 मध्ये 15 व्या वित्त आयोगातून शहरी व निमशहरी भागासाठी नवीन नागरी आरोग्य केंद्रे सुरु होत आहेत. त्यासाठी नगरपालिकेला स्वत:च्या मालकीची जागा उपलब्ध करावी लागणार आहे. जागा नसेल तर 15 हजार रुपये प्रति महिना भाडे असलेली जागा उपलब्ध करुन द्यायची आहे. स्वमालकीची इमारत असेल तर ती 1 हजार 500 चौरस फूट ते 2 हजार 500 चौरस फुटांपर्यंत असणे आवश्यक आहे. त्याठिकाणी पाणीपुरवठा, शौचालय, वीज याची उपलब्धता आवश्यक आहे.

आरोग्य केंद्रांमध्ये वैद्यकिय अधिकारी (एमबीबीएस), औषध निर्माता, स्टाफ नर्स, शिपाई या पदांची नियुक्ती केली जाणार आहे. या कर्मचार्‍यांचे मानधन, औषधे व साहित्य, इमारत भाडे व किरकोळ खर्च जिल्ह्याला प्राप्त होणार्‍या 15 व्या वित्त आयोगाच्या निधीतून केला जाणार आहे. सातार्‍यात होत असलेल्या नव्या नागरी आरोग्य केंद्रांमुळे सातारकरांना दिलासा मिळणार आहे.

सातारा शहरासह हद्दवाढ भागात सहा नागरी आरोग्य केंद्रे मंजूर झाली आहेत.
या केंद्रांसाठी इमारत किंवा उपलब्ध जागेची पाहणी करण्यात आली आहे. नव्या केंद्रांमुळे शहरवासीयांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळण्यास मदत होणार आहे. कोरोना काळात नवी केंद्रे लवकर सुरू करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.
– अभिजित बापट
मुख्याधिकारी, सातारा

Back to top button