राजापूर : निलंबित एस. टी.चालकाचे हृदयविकाराने निधन | पुढारी

राजापूर : निलंबित एस. टी.चालकाचे हृदयविकाराने निधन

राजापूर ; पुढारी वृत्तसेवा : एसटीच्या संपात सहभागी झाल्यामुळे निलंबन कारवाई झालेले राजापूर आगारातील चालक व वाहक अशी दुहेरी जबाबदारी सांभाळणारे राकेश रमेश बांते (वय 35) यांचे बुधवारी रात्री साडेदहा वाजता हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

गेले काही दिवस राज्यात एसटी कर्मचार्‍यांचा संप सुरू असून संप मागे घेऊन कामावर हजर व्हा, असे शासनाकडून सातत्याने आवाहन केले जात आहे. मात्र, कर्मचारी हजर न झाल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई सुरू केली आहे. काही कर्मचार्‍यांच्या बदल्या केल्या आहेत.

राजापूर आगारातील सुमारे वीस ते पंचवीस कर्मचार्‍यांवर निलंबनाची कारवाई झाल्याची माहिती संपात उतरलेल्या कर्मचार्‍यांकडून मिळाली. त्यात गेली चार वर्षे चालक व वाहक अशी दुहेरी जबाबदारी सांभाळणारे राकेश बांते यांचाही सामावेश होता. 10 डिसेंबर रोजी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.

तेव्हापासून ते तणावाखाली होते, अशी माहिती त्यांच्या सहकारी कर्मचार्‍यांनी दिली. दरम्यान, अत्यवस्थ वाटू लागल्याने बुधवारी त्यांना राजापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. तेथे त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, रात्री साडेदहा वाजता त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला व त्यामध्ये त्यांची प्राणज्योत मालवली.

राकेश बांते हे विदर्भातील भंडारा जिल्ह्यातील होते. गेली चार वर्षे ते राजापूर आगारात कार्यरत होते. ते पत्नी व दोन लहान मुलांसह राजापुरात राहत होते. भंडारा येथील त्यांच्या नातेवाईकांना या घटनेची माहिती दिल्यानंतर ते राजापूरकडे येण्यासाठी निघाले आहेत. या दुर्घटनेनंतर एसटी विभागाच्या वतीने तातडीची 5 हजार रुपयांची आर्थिक मदत आगाराच्या वतीने मृत बांते यांच्या पत्नीला देण्यात आली.

Back to top button