सिंधुदुर्ग : चार नगरपंचायतीसाठी ७६.५० टक्के मतदान | पुढारी

सिंधुदुर्ग : चार नगरपंचायतीसाठी ७६.५० टक्के मतदान

सिंधुदुर्ग ; पुढारी वृत्तसेवा : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ, देवगड, वैभववाडी व दोडामार्ग या चार नगरपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मंगळवारी शांततेत मतदान झाले. या चारही न.पं.साठी मिळून सरासरी 76.50 टक्के एवढे मतदान झाले. चारही न.पं.च्या एकूण 52 जागांसाठी 154 उमेदवार रिंगणात आहेत. या सर्व उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात सील झाले आहे. चारही न.पं. क्षेत्रांत मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. सर्वच ठिकाणी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

मंगळवारी सकाळी 7.30 वा. पासून मतदान प्रक्रियेस सुरुवात झाली. सकाळच्या सत्रात थंडीचा प्रभाव असल्याने मतदानाची टक्केवारी काहीशी कमी होती. सकाळी 10 वाजल्यानंतर सर्वच ठिकाणी मतदारांची गर्दी झाल्याचे चित्र दिसून आले. दुपारच्या सत्रात मतदानाचा वेग काहीसा मंदावला. त्यानंतर सर्वच पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी मतदारांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. यामुळे सायंकाळच्या सत्रात मतदानाचा वेग वाढून सर्वच ठिकाणी समाधानकारक मतदान झाले. यामध्ये कुडाळ 71.62 टक्के, देवगड न.पं. साठी 71 टक्के तर दोडामार्ग व वैभववाडी न.पं. साठी प्रत्येकी 81.86 टक्के असे सरासरी मतदान झाले.

कुडाळमध्ये जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांकडून पाहणी

जिल्ह्यातील लक्षवेधी नगरपंचायत असलेल्या कुडाळ नगरपंचायतीच्या मतदान प्रक्रियेची जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी व जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. राजेंद्र दाभाडे यांनी भेट देऊन पाहणी केली. येथील निवडणूक अधिकार्‍यांशी चर्चा करत त्यांनी एकंदरित निवडणुकीचा आढावा घेत काही सूचना केल्या. याबरोबरच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आ. वैभव नाईक, भाजपचे प्रदेश चिटणीस, माजी खा. नीलेश राणे यांनीही कुडाळ शहरातील काही मतदान केंद्रांना भेट देत कार्यकर्त्यांशी चर्चा केली.

कुडाळ अभिनवनगर केंद्रावरील मतदानयंत्र पडले बंद

कुडाळ शहरातील अभिनवनगर मतदान केंद्रावरील मतदान यंत्र सुरुवातीलाच बंद पडले. त्याठिकाणी पर्यायी मतदान यंत्र उपलब्ध केल्यानंतर तेथील मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली. यामुळे अभिनवनगर केंद्रावर सुमारे अर्धा तास उशिरा मतदानास सुरुवात झाली.

154 उमेदवारांचे भवितव्य सील

या चारही नगरपंचायतींच्या प्रत्येकी 13 जागांसाठी मिळून 52 जागांसाठी मिळून 154 उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये देवगड 40, कुडाळ 41, वैभववाडी 37 व दोडामार्ग 36 अशी उमेदवारांची संख्या आहे. या सर्व उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात सील झाले असून, याचा निकाल 19 जानेवारी 2022 रोजी जाहीर होणार आहे.

Back to top button