नंदुरबार जिल्ह्यात ३ पिस्तुल, ३ तलवारींसह शस्त्रे जप्त | पुढारी

नंदुरबार जिल्ह्यात ३ पिस्तुल, ३ तलवारींसह शस्त्रे जप्त

नंदुरबार; पुढारी वृत्तसेवा: शहादा, नंदुरबार आणि नवापूर या तीन तालुक्यांत रविवारी मध्यरात्री नंदुरबार जिल्हा पोलिसांनी धाड टाकली. ३ पिस्तुल, ३ तलवारीसह चाकू, सुरे, गुप्ती यासारखे शस्त्रे जप्त केली. नवनियुक्त जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनात राबवलेल्या ऑल आऊट मोहिमेनंतर ही कारवाई करण्‍यात आली.

नंदुरबार जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणारे आणि विकणारे यांची गुप्त माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांना तसेच स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांना मिळाली होती. याच्या अधारे अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार, उपअधीक्षक सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार, नवापूर, शहादा, तळोदा शहर व तालुका पोलीस ठाण्यांना सतर्क करण्यात आले. त्याअंतर्गत संबंधित पोलीस ठाण्यांनी बंदोबस्त लावला होता.

नंदुरबार शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात विजय काशिनाथ जाधव (वय २५ राहणार. अभिनव कॉलनी, सेंधवा, ता. बडवानी) हा तरुण मध्यप्रदेशातील असून रविवारीच्या (दि. १२ ) मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास संशयितरित्या फिरताना आढळला. पोलिसांनी त्याची चौकशी केली. त्याच्याकडे ५५ हजार रुपये किंमतीचे लोखंडी गावठी बनावटीचे पिस्तुल व पंधराशे रुपये किंमतीचे तीन जिवंत काडतूसे आढळून आली. पाेलिसांनी त्‍याला अटक केली.

याप्रकरणीपोलीस शिपाई योगेश पवार यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदण्यात आला. अवैध शस्त्र बाळगणे, मनाई आदेशाचे उल्लंघन करणे तसेच भारतीय हत्यार कायदा कलम ३/५ चे उल्लंघन यासह विविध कलमान्वये ९ गुन्हे दाखल केले आहेत. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश माळी  करीत आहेत.

नवापुर तालुक्यातील चिंचपाडा येथे देवळफळी परिसरात जगन्नाथ प्रकाश गोंडा (रा. कालासुना पोस्ट, नोंडाज्वरी, जिल्हा गंजम) हा ओडिसा राज्यातील तरुण मध्यरात्री संशयास्पदरित्या फिरताना आढळला. त्याच्याकडे चौकशी केली असता पंचवीस हजार रुपये किंमतीचे लोखंडी पिस्तुल सापडले. पोलिस नायक जितेंद्र तोरवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यानंतर अवैध पिस्तुल बाळगणारा सचिन दिलीप तांबोळी (वय २४, शिवाजीनगर, शहादा) याला शहादा शहरातील शिरूड चौफुली येथे पकडण्यात आला. पोलीस शिपाई विजय ढिवरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पंचवीस हजार रुपयाचे पिस्तुल आणि पाचशे रुपये किंमतीचे एक काडतूस त्याच्याकडे आढळले आहे.

याचबरोबर नंदुरबार शहरातील महाराष्ट्र व्यायाम शाळा परिसरात चाकू घेऊन फिरणाऱ्या नितीन धनदास कोकणी यालाही पकडण्यात आले. दरम्यान, नवापूर शहरातील देवळफळी परिसरात राहुल संजय गावित (रा. चिंचपाडा) यास विसरवाडी येथून तुकाराम शंकर गावित (रा. चितवी, तालुका नवापूर) यास तर शहादा शहरातील जुनी भाजी मंडी परिसरात गोकुळ सुनील सोनवणे असे तीन जण धारदार तलवार बाळगताना पकडले गेले. त्यांच्याविरोधात संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. याशिवाय मुकेश विजू वसावे (रा. कुणब्याफळी, चिंचपाडा) याच्याकडून धारदार लोखंडी गुप्ती तर चिंचपाडा बस थांब्यावर सुरा ( शस्त्रे जप्त ) घेऊन फिरताना भानुदास मनोज वसावे याला अटक करण्यात आली आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button