सिंधुदुर्ग: तिलारी घाटात आंध्रप्रदेशातील पर्यटकांची कार जळून खाक | पुढारी

सिंधुदुर्ग: तिलारी घाटात आंध्रप्रदेशातील पर्यटकांची कार जळून खाक

दोडामार्ग, पुढारी वृत्तसेवा : पर्यटनाचा मनमुराद आनंद लुटून रणरणत्या उन्हात तिलारी घाटातून परतीच्या प्रवासाला निघालेल्या पर्यटकांच्या कारला घाटात अचानक आग लागली. ही घटना रविवारी (दि.२१) दुपारी १.३० च्या सुमारास घडली. आग आटोक्यात आणण्यापूर्वीच कार जळून खाक झाली. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र, पर्यटकांचे काही सामान जळाले. या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांनी बर्निंग कारचा थरार अनुभवला.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, आंध्रप्रदेश येथील पाच पर्यटक पर्यटनासाठी कारने गोव्याला आले होते. पर्यटनाचा आनंद लुटून आज दुपारच्या सुमारास ते तिलारी घाट मार्गे परतीच्या प्रवासाला निघाले. दुपारी १:३० च्या सुमारास तिलारी घाट चढत असताना घाटाच्या उत्तरार्धात त्यांची गाडी पोहोचली असता चालकास कारच्या समोरील बाजूतून धूर येत असल्याचे निदर्शनास आले. त्याने तत्काळ प्रसंगावधान राखत कारचा वेग कमी केला. मात्र, वेळ फारच कमी असल्याने त्याने हॅन्ड ब्रेक लावून गाडी रस्त्यातच उभी केली. कारमधील पाचही पर्यटक खाली उतरले. त्यांनी कारमधील साहित्य बाहेर काढण्यास सुरुवात केली. मात्र, कारला आग लागून धुराचे मोठे लोट बाहेर पडू लागले. त्यामुळे भयभीत झालेल्या पर्यटकांचे काही सामान कारमध्येच अडकले.

दुपारच्या रणरणत्या उन्हाचा तडाखा आणि वाऱ्याची झुळुक यामुळे आग वाढत गेली. कारने पेट घेतल्याचे दिसताच या घटनेची माहिती चंदगड पोलीस आणि अग्निशमन दलाला कळविण्यात आली. चंदगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरक्षित राहील याची दक्षता घेतली. काही वेळात चंदगड नगरपंचायतीच्या अग्निशमन दलाचा बंबदेखील दाखल झाला. तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. संपूर्ण कार आगीच्या ज्वालांनी वेढलेली होती. अग्निशमन जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविले.

यादरम्यान, घाटात रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. आग आटोक्यात आणल्यानंतर पोलिसांनी जेसीबीला पाचारण केले व बर्निंग कारचे अवशेष बाजूला केले. त्यानंतर वाहतुक पूर्ववत सुरू झाली. घाटातून प्रवास करणाऱ्या अनेकांनी यावेळी बर्निंग कारचा थरार पाहिला. या दुर्घटनेत पर्यटकांचे मोठे नुकसान झाले आहे.

कार जळत असताना कारचे लोखंड, फायबर व प्लास्टिक वितळण्यास सुरुवात झाली. फायबर व प्लास्टिक जळून खाक झाले. तर लोखंड आगीत वितळून रस्त्यावर पाघळू लागले. आगीमुळे कारचा स्फोट होईल या भीतीने पर्यटक व इतर वाहन चालकांनी दूर राहणेच पसंत केले. यावेळी तिलारी घाटातील तीव्र स्वरूपाचे चढाव व रविवारी दुपारच्या सुमारास उष्णतेची वाढलेली दाह यांमुळेच कारने पेट घेतल्याचा अंदाज बर्निंग कार चालकाने व्यक्त केला.

हेही वाचा 

Back to top button