कोल्हापुरात खंडपीठ होणे गरजेचे; न्यायमूर्ती भूषण गवई यांचे मत | पुढारी

कोल्हापुरात खंडपीठ होणे गरजेचे; न्यायमूर्ती भूषण गवई यांचे मत

देवगड, पुढारी वृत्तसेवा : शेवटच्या घटकापर्यंत न्याय द्यायचा असेल तर त्याला सहज न्याय मिळवून देण्याची सोय आपण उपलब्ध करून दिली पाहिजे. यासाठी मुंबईला जाऊन उच्च न्यायालयात न्याय मागणे ही गोष्ट फार खर्चिक व वेळेचा अपव्यय करणारी आहे. यामुळे कोल्हापूर येथे खंडपीठ किंवा सर्किट बेंचची गरज आहे, असे मत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी शनिवारी देवगड येथे व्यक्त केले. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी खंडपीठ लवकरात लवकर व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

देवगड येथील दिवाणी न्यायालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन व कोनशिला समारंभात न्या. गवई यांनी हे मत व्यक्त केले. न्यायमूर्ती गवई म्हणाले, न्याय देणार्‍या पायाभूत सुविधा भक्कम करणे गरजेचे आहे. शेवटच्या घटकाला न्यायप्रक्रियेत आणून त्याच्या मनात न्यायपालिकेबद्दल विश्वास निर्माण करणे महत्त्वाचे आहे.

मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्रकुमार म्हणाले, गरीब माणूस न्यायासाठी जिल्ह्यातील न्यायव्यवस्थेकडे येतो. जिल्ह्यातील न्यायसंस्था म्हणजे न्यायदानाचा पाया आहे. यामुळे या संस्था भक्कम होणे गरजेचे आहे. न्या. नितीन बोरकर म्हणाले, न्यायिक व्यवस्थेत पायाभूत सुविधांची गरज असून न्यायप्रक्रियेत नवीन इमारत तयार झाल्यानंतर जलदगतीने न्याय मिळेल. केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, जिल्हाधिकारी किशोर तावडे उपस्थित होते.

Back to top button