Tilari Ghat : तिलारी घाटात टेम्पो उलटला; चालक जखमी

Tilari Ghat : तिलारी घाटात टेम्पो उलटला; चालक जखमी

Published on

दोडामार्ग : पुढारी वृत्तसेवा : तिलारी घाट उतरत असताना एका टेम्पोला अपघात होऊन चालक गंभीर जखमी झाला. ही घटना आज (दि.१९) दुपारी १२ च्या सुमारास घडली. या अपघातात टेम्पोचे केबिन पूर्णपणे चेपले गेल्याने चालक आतच अडकून राहिला. तब्बल दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर चालकास केबिन मधून बाहेर काढण्यात यश आले. स्वप्निल यादव (वय ३२, रा. मुंबई) असे जखमी चालकाचे नाव आहे. त्याला चंदगड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. Tilari Ghat

बेळगाव, कोल्हापूर, पुणे, मुंबई‌ यासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, तेलंगणा या दक्षिण भारतातील पर्यटक गोव्याला जाण्यासाठी तिलारी घाट मार्गे जाणे पसंत करतात. कारण हा मार्ग जवळचा असल्याने तिलारी घाटातून वाहतूक वाढत चालली आहे. तिलारी घाट हा तीव्र उताराच्या वळणाचा असा घाट आहे. स्वप्निल यादव टेम्पो घेऊन आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास तिलारी घाट उतरत होता. घाटाच्या सुरुवातीलाच असलेल्या तीव्र उताराच्या वळणाचा अंदाज चालकास आला नाही. परिणामी त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले व गाडी चालकाच्या बाजूने थेट घळणीत कलंडून अपघात झाला. Tilari Ghat

या अपघातात टेम्पोचे केबिन चेपले गेले. सीट व स्टेअरिंग मध्ये चालक अडकला. त्याला बाहेर पडणे मुश्किल झाले. दरम्यान, रस्त्यावरून मार्गस्थ होणाऱ्या वाहन चालकांनी बचाव कार्यासाठी प्रयत्न केले. मात्र, त्यात त्यांना यश आले नाही. अपघाताची वार्ता लगतच्या गावातील ग्रामस्थांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. चंदगड पोलिसही घटनास्थळी दाखल झाले.

Tilari Ghat  तब्बल दोन तासानंतर चालकाची सुटका

गाडी चालकाच्या बाजूने कलंडल्याने व स्टेअरिंग आणि सीटमध्ये चालक अडकल्याने त्याला बाहेर काढणे मुश्किल झाले होते. यावेळी जमलेल्या ग्रामस्थांनी चालकास बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. दरम्यान जेसीबी व ग्रामस्थांच्या मदतीने तब्बल दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर चालकास बाहेर काढण्यात यश आले. या अपघातात चालक स्वप्नील गंभीर जखमी झाला. त्याच्या पायालादेखील खरचटले होते. रुग्णवाहिकेतून त्याला उपचारासाठी चंदगड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती चंदगड येथील सहाय्यक फौजदार कसेकर यांनी दिली.

गगनबावडा घाट वाहतुकीसाठी १५ जानेवारीपासून बंद झाल्याने तिलारी घाटातून वाहतूक वाढली आहे. त्यामुळे अपघातामुळे वाहतूक कोंडी झाली. मात्र, चंदगड पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यावर विशेष लक्ष दिल्याने वाहतूक टप्प्याटप्प्याने सुरू झाली होती.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news