सिंधुदुर्ग : टस्‍करकडून फळबागांचे नुकसान; शेतकऱ्यांमध्ये घबराट | पुढारी

सिंधुदुर्ग : टस्‍करकडून फळबागांचे नुकसान; शेतकऱ्यांमध्ये घबराट

दोडामार्ग : पुढारी वृत्तसेवा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील बांबर्डे परिसरात (गुरूवार) सायंकाळी ६:३० वाजण्याच्या सुमारास टस्कर व टस्‍कराचे पिल्लू थेट शेतकऱ्यांच्या फळबागयतीत घुसले. हत्ती आल्याची माहिती ग्रामस्थांना मिळताच शेतकरी बागयतीत आले. यावेळी टस्कर एक भला मोठा माड कोसळवण्याच्या प्रयत्नात होता. मात्र ग्रामस्थांनी आरडाओरडा करुन हत्तींना जंगलाच्या दिशेने हुसकावून लावले.

बांबर्डे, घाटीवडे परिसरात दाखल झालेल्या टस्कर व हत्तीच्या पिल्लाने अक्षरशः उच्छाद मांडला आहे. काही दिवसांपूर्वी या हत्तींनी आपला मोर्चा तेरवण-मेढे, मोर्ले, घोटगेवाडी गावाकडे वळविला होता. तेथील केळी, नारळ, सुपारी, काजू बागायतींचे अतोनात नुकसान केले. त्यानंतर पाळये येथे जात तेथेही फळबागायतींचे नुकसान केले. हे हत्ती पुन्हा बांबर्डे परिसरात दाखल झाले आहेत. गुरूवारी सायंकाळी ६:३० वाजण्याच्या सुमारास टस्कर व पिल्लू शेतकऱ्यांच्या फळबागयतीत घुसले. यावेळी टस्कर एका भल्या मोठ्या माडाला सोंडेने जमीनदोस्त करण्याच्या प्रयत्नात होता.

दरम्यान हत्ती आल्याची माहिती ग्रामस्थांना होताच ते दाखल झाले व आरडाओरडा करू लागले. यावेळी हत्तींनी जंगलाच्या दिशेने मोर्चा वळविला. हत्ती जात असताना पाळीव कुत्र्यांनी हत्तींवर हल्ला केल्याने बिथरलेल्या हत्तीदेखील माघारी फिरून कुत्र्यांवर चाल केली. हत्ती माघारी फिरल्याचे पाहताच ग्रामस्थांची पळता भुई थोडी झाली. त्यानंतर उपस्थित ग्रामस्थांनी पुन्हा जोरजोरात कालवा केला. अखेर हत्तींना जंगलात हुसकावण्यात ग्रामस्थांना यश आले.

काजू बागेत जाणे देखील बनले मुश्किल

सध्या काजूचा हंगाम असल्याने व हत्ती दिवसाढवळ्या फळ बागायतीत येत असल्याने बागायतीत जावे की नाही? असा यक्षप्रश्न शेतकऱ्यांसमोर ठाम मांडून उभा आहे. कारण टस्करासोबत एक पिल्लू आहे. तसेच भल्या मोठ्या टस्कराचे सुळे अतिशय लांब आहेत. बागायतीत घुसलेल्या या हत्तींना हुसकावताना पिल्लाच्या संरक्षणार्थ टस्कर चाल करून येत आहे. त्यामुळे या हत्तींना पिटाळून लावणे जोखमीचे आहे. हत्तींचा वावर आता वाढत चालला असून, वनविभागाने या हत्तींना पिटाळून लावावे व आम्हाला भयमुक्त करावे, अशी मागणी ग्रामस्थ व शेतकरी करत आहेत.

हेही वाचा :

Back to top button