रिफायनरी प्रस्तावित जागीच होणार : नारायण राणे

रिफायनरी प्रस्तावित जागीच होणार : नारायण राणे

राजापूर, पुढारी वृत्तसेवा : प्रस्तावित रत्नागिरी रिफायनरी प्रकल्पामुळे कोकणच्या विकासाला नवा आयाम मिळणार आहे. हा प्रकल्प राजापूर तालुक्यातच रिफायनरीच्या प्रस्तावित जागी होणार असल्याची ग्वाही केंद्रीय सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी रिफायनरी प्रकल्प समर्थक समन्वय समितीला दिली आहे.

या प्रकल्पाबाबत केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांची आपण पुढील आठवड्यात भेट घेणार आहोत. त्यानंतर जानेवारी महिन्यात राजापुरात केंद्रीय उद्योग विभाग व राज्य शासनाचा औद्योगिक विभागाची संयुक्त बैठक घेऊन या प्रकल्पाबाबतची भूमिका जनतेसमोर मांडणार असल्याची ग्वाहीही ना. राणे यांनी यावेळी दिली.

रिफायनरी प्रकल्प समर्थक समन्वय समितीच्या पदाधिकार्‍यांनी शुक्रवारी ना. राणे यांची नवी दिल्ली येथील उद्योग भवनात भेट घेतली. ना. राणे यांनी स्वत: या बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी समितीकडून प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाबाबतच्या आजवरच्या घडामोडींचा आढावा घेतला. महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशीदेखील बैठकी दरम्यान संपर्क साधून या प्रस्तावित प्रकल्पाच्या घडामोडींविषयी चर्चा केली. या प्रकल्पाच्या अनुषंगाने आजवरच्या महाराष्ट्र शासनाच्या एकूणच कार्यवाहीची माहिती जाणून घेतली.

हा प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वित होण्याच्या दृष्टीने आपण पुढच्या आठवड्यात केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांची भेट घेऊन चर्चा करणार आहे, असे सांगितले. राजापूर येथे प्रस्तावित असलेल्या रिफायनरी प्रकल्पाबाबत केंद्रीय भूमिका स्पष्ट करून ती भूमिका येत्या जानेवारीत उद्योग मंत्रालय केंद्र सरकार आणि उद्योग मंत्रालय महाराष्ट्र सरकार अशी संयुक्त बैठक राजापुरात घेण्याचे त्यांनी आश्वासन दिले. या बैठकीत रिफायनरीच्या प्रकल्पाच्या संदर्भातील सद्यस्थिती स्पष्ट केली जाणार असल्याचे ना. राणे यांनी सांगितले.
यावेळी रिफायनरी प्रकल्प समिती समन्वय समितीचे अध्यक्ष महेश शिवलकर, भाजपा जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष नंदकिशोर चव्हाण, भाजपा जिल्हा सरचिटणीस सतेज नलावडे, देवाचे गोठणे-नाटे-राजवाडी -सोलगाव प्रकल्प समर्थक समन्वय समितीचे अध्यक्ष डॉ. सुनील राणे, उपाध्यक्ष संतोष चव्हाण, प्रशांत गांगण, आशिष कीर, विश्राम परब आदी उपस्थित होते.

समर्थनार्थ 125 ग्रा.पं.चा ठराव

राजापूर तालुक्यात प्रस्तावित असलेल्या या रत्नागिरी रिफायनरी प्रकल्पाला सुमारे 125 ग्रामपंचायती, 55 विविध संघटनांनी तसेच रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील स्थानिक स्वराज्य संस्थांनी प्रकल्प समर्थनार्थ ठराव केलेले आहेत. तसेच ज्या परिसरात हा प्रकल्प प्रस्तावित आहे, अशा धोपेश्वर, बारसू, नाटे आणि राजवाडी या गावांतील 1400 पैकी 1200 कुटुंबाचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यामध्ये सर्वांनी प्रकल्पाबाबत सकारात्मकता दर्शविली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news