रत्नागिरी : धोपेश्वर बारसू हद्दीत दुचाकीला बिबट्याची धडक; युवक जखमी | पुढारी

रत्नागिरी : धोपेश्वर बारसू हद्दीत दुचाकीला बिबट्याची धडक; युवक जखमी

राजापूर; पुढारी वृत्तसेवा : भालावली येथून राजापूरकडे येत असताना राजापूर धारतळे मार्गावरील धोपेश्वर बारसू हद्दीत दुचाकीला पाठीमागून बिबट्याने जोरदार धडक दिली. या हल्ल्यात एक युवक किरकोळ जखमी झाला आहे. जखमी युवकाचे नाव राज मारूती भोसले ( वय १८, रा. भालावली, वरची भंडारवाडी) असे आहे. दरम्यान आरडाओरड केल्याने बिबटयाने जंगलात धुम ठोकल्याने सुदैवाने हा युवक बालंबाल बचावला आहे. शनिवारी (दि. २५) रोजी रात्री ८.३० वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली.

संबंधित बातम्या 

याबाबतची माहिती अशी की, राज भोसले हा शनिवारी रात्री वाडीतील त्याचा एक मित्र राहुल श्रीधर भोसले सोबत दुचाकीवरून राजापूरकडे येत होता. यावेळी राहुल दुचाकी चालवत होता व तर राज हा त्याच्या पाठीमागे बसला होता. हे दोघे बारसू परीसरातून पुढे येत असताना बारसू येथील वळणावर अचानक पाठीमागून बिबटयाने दुचाकीला धडक दिली. यावेळी हे दोघेही दुचाकीसह रस्त्यावर कोसळले. दरम्यान बिबटयाने राज भोसले याच्यावर हल्ला केला. या हल्यात बिबट्याने राजच्या हातावर व मांडीवर नखाने ओरखडे ओढले आहेत. यानंतर दोघांनी आरडाओरडा केल्यानंतर बिबटयाने जंगलात धूम ठोकली.

यानंतर तात्काळ राजला राजापूर ग्रामीण रूग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान नातेवाईकांनाही दुरध्वनीवरून माहिती दिली. राजापूरचे वनपाल सदानंद घाडगे, वनरक्षण श्री. कुंभार, विजय म्हादये हे तात्काळ राजापूर ग्रामीण रूग्णालयात दाखल झाले आहेत. वैद्यकिय उपचारानंतर राजची प्रकृती बरी असल्याने त्याला रविवारी घरी सोडण्यात आले आहेत.

या घटनेबाबत तात्काळ वनपाल सदानंद घाडगे यांनी दखल घेते घटनास्थळी जावून पंचनामा केला आहे. तर बिबटयाच्या बंदोबस्तासाठी तातडीने काय उपाययोजना करता येतील? याबाबत वनविभागाचे अधिकारी या परिसरात प्रत्यक्ष पाहणी करून निर्णय घेणार आहेत.

Back to top button