सिंधुदुर्ग : नांदगाव- पाटीलवाडीत भरधाव कारचे नियंत्रण सुटून अपघात; युवती जखमी | पुढारी

सिंधुदुर्ग : नांदगाव- पाटीलवाडीत भरधाव कारचे नियंत्रण सुटून अपघात; युवती जखमी

नांदगाव : पुढारी वृत्तसेवा : मुंबई- गोवा महामार्गावर ( क्र. ६६ ) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नांदगाव- पाटीलवाडी येथे भरधाव कारवरील नियंत्रण सुटल्याने थेट तिने येथील दत्तमंदिर बस स्टॉपला धडक दिली. आणि ही कार महामार्गाच्या विरूद्ध दिशेला पटली झाली. बस स्टॉप जमिनदोस्त होवून मोठे नुकसान झाले आहे. या अपघातात बसस्टॉपमधील एक कॉलेज युवती गंभीर जखमी झाली असून इतरांनी प्रसंगावधान बाळगल्याने मोठा अनर्थ टळला. हा अपघात आज सकाळी ८:३० च्या सुमारास घडला. जखमी युवतीचे कु. प्रेरणा राजेंद्र तांबे (वय १८, रा. नांदगाव बोध्दवाडी ) असे नाव आहे.

संबंधित बातम्या 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, प्रेरणा राजेंद्र तांबे ही नेहमीप्रमाणे कणकवली येथे कॉलेजला जाण्यासाठी नांदगाव- पाटीलवाडी येथील दत्तमंदिर बसस्टॉपवर (मुंबई -गोवा महामार्ग ) बसली होती. यादरम्यान रत्नागिरीवरून गोव्याच्या दिशेने कार चालक निनाद सुभाष शिरदनकर हे जात होते. यावेळी त्याची कार नांदगाव -पाटीलवाडी येथे आली असता त्याचा कारवरील ताबा सुटला आणि कार थेट बसस्टॉपमध्ये घुसली. यानंतर बसस्टॉप कोसळून जमिन दोस्त झाले. या अपघातात बसस्टॉपमधील प्रेरणा हीच्या पायाला गंभीर दुखापत झाली तर बाकी प्रवासी तेथून बाजूला जाण्यास यशस्वी झाल्याने मोठा अनर्थ टळला.

या अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी धाव घेत मदतकार्य करत जखमी प्रेरणाला कणकवली येथील खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. कणकवली पोलीस चंद्रकांत माने व इतर घटनास्थळी दाखल होवून प्राथमिक माहिती घेत पंचनामा केला. तर सरपंच रविराज मोरजकर, हायवे पोलीसासह ग्रामस्थांनी वाहतूक सुरळीत करण्यास मदतकार्य केले.

दरम्यान या ठिकाणी बसस्टॉप हा हायवेच्या लेनला लागूनच असल्याने बस ही हायवेवरच थांबत प्रवासी चढत- उतरत असतात. यामुळे बसस्टॉपबाबत वारंवार तक्रारी देऊनही प्रश्न मार्गी न लागल्याने ग्रामस्थांनी रोष व्यक्त केला. अपघाताचा अधिक तपास कणकवली पोलीस करत आहेत.

Back to top button