रत्नागिरी जिल्ह्यात ‘रेड अ‍ॅलर्ट’

रत्नागिरी जिल्ह्यात ‘रेड अ‍ॅलर्ट’

रत्नागिरी ; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्याला सलग तिसर्‍या दिवशी धुवाधार पावसाने झोडपून काढले. रविवारपासून सुरू झालेल्या पावसाची संततधार मंगळवारीही सुरू होती. जिल्ह्यातील खेड व राजापूर येथील पूरस्थिती ओसरली असली, तरी सर्व नद्या दुथडी भरून वाहत होत्या. कोकणातीतल रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत रेड, तर पालघर आणि ठाणे जिल्ह्यांत ऑरेंज अ‍ॅलर्ट कायम केला आहे. मंगळवारी दुपारनंतरही संगमेश्वरमध्ये शास्त्री नदी इशारा पातळीच्या वर वाहत होती.

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र सक्रयि झाल्याने अरबी समुद्रावरून वार्‍यांचा प्रवाह वाढू लागला आहे. त्यामुळे पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, आगामी 48 तास मुंबईसह कोकणातील सर्वच जिल्ह्यांत अतिवृष्टीची शक्यता भारतीय हवामान विभागाच्या कुलाबा वेधशाळेने वर्तविली आहे.

मोठ्या विश्रांतीनंतर परतलेल्या पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे. दरम्यान, अजूनही आगामी दोन दिवस मुंबईसह कोकणातील सर्वच जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता 'आयएमडी'ने वर्तविली आहे. त्यामुळे आगामी आठवडाभर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदिुर्ग जिल्ह्यात रेड तर पालघर आणि ठाणे जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट कायम केला आहे. स्थानिक प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिला आहे. या जिल्ह्यात मध्यम ते अतिवृष्टी होणार असल्याचा अंदाज आयएमडीने वर्तविला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात रविवारी रात्रीपासून कोकणातील अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुंबईसह कोकणातील सर्वच जिल्ह्यांत पावसाने हजेरी लावली. दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यासह सिंधुदुर्गात बहुतांश भागात दमदार पावसाने दाणादाण उडवून दिली आहे. काही ठिकाणी गेल्या 24 तासांत दीडशे ते 250 मि. मी. पर्जन्य नोंद झाली.

मंगळवारी संपलेल्या 24 तासात जिल्ह्यात 141 मि,मी. च्या सरासरीने 1271 मि.मी. एकूण पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये सर्वाधिक पाऊस मंडणगड तालुक्यात कोसळला असून, मंडणगडात तब्बल 232 मि. मी. पावसाची विक्रमी नोंद झाली आहे. दापोली 158, खेड आणि चिपळूण प्रत्येकी 104, गुहागर 126, लांजा 120, राजापूर 147 , संगमेश्वर आणि रत्नागिरी तालुक्यात अनुक्रमे 139 आणि 141 मि.मी. पावसाची नोंद झाली.

सोमवारी संध्याकाळपर्यंत रत्नागिरी त जोरदार पावसाची नोंद झाली. त्यामुळे या भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे. काही भागात रस्ते वाहतुकीसाठी बाधीत झाले आहेत तर काही भागातील बाजरपेठा मुसळधार पावसाने पाण्याखाली गेल्या आहेत.

राजापूर तालुक्यासह खेड आणि चिपळूण तालुक्यात अनेक नद्यांची जलपातळीत वाढ झाल्याने पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली होती. मंगळवारी सकाळी पावसाचा जोर काही प्रमाणात कमी झाल्याने येथील पूरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मदत झाल्याचे नियंत्रण कक्षातून कळविण्यात आले आहे.

पावसाचा जोर पुढील काही दिवस कायम राहणार असून, पुढील 48 तास रत्नागिरी जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा ते तीव्र मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज 'आयएमडी'ने वर्तविला आहे. मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पुढील दोन दिवस तीव्र मुसळधार पावसामुळे येथील प्रशासनांनी दुर्गम भागात सावधगिरीचा आणि किनारी भागात सज्जतेच्या सूचना केल्या आहेत.

राजापुरात वाहून गेलेल्या एकाचा शोध सुरूच

राजापूर : पुढारी वृत्तसेवा

पावसाच्या अखंड रुद्रावतारामुळे शहरात भरलेला पूर ओसरला असला, तरी पुराने आपल्या खुणा मागे ठेवल्याने नगर परिषदेला रस्त्यांच्या स्वच्छतेची मोहीम हाती घ्यावी लागली आहे. दरम्यान, अर्जुना आणि कोदवली नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने सोमवारी राजापूर शहरात पुराचे पाणी भरून जनजीवन विस्कळीत झाले होते.

या पुरात वाहून गेलेल्या सहदेव खेमाजी सोड्ये (वय 40) या प्रौढाचा अद्याप शोध लागलेला नाही. वाहून बेपत्ता झालेला प्रौढ उन्हाळे येथील सल्याची नोंद पोलिस स्थानकात झाली आहे.

मंगळवारी पहाटे पूर ओसरल्याने व्यापारी आणि नागरिकांनी नि:श्वास टाकला आहे. रविवारी व सोमवारी शहरासह तालुक्यात झालेल्या तडाखेबंद पावसाने ग्रामीण भागातील अनेक मार्गावर पाणी आल्याने दळणवळण ठप्प झाले होते. शेतीबागायतींत पाणी भरल्याने शेतीचेही नुकसान झाले होते. सोमवारी रात्री पावसाने आणखी जोर केल्याने महामार्गावरील ब्रिटिशकालीन पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता.

सार्व. बांधकाम विभागाने पोलिस यंत्रणेला पत्र देऊन या पुलावरील वाहनांची रहदारी थांबवण्याची विनंती केली होती. मंगळवारीही पावसाने सातत्य राखले होते. मात्र, पूर ओसरल्याने व्यापार्‍यांनी आपल्या साहित्याची पुन्हा मांडामांड करण्यास सुरूवात केली होती.

सोमवारी शहरात पूर भरल्याने सोमवारी सायंकाळी अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी राजापूरला भेट दिली. शहरात होडीतून प्रवास करीत त्यांनी पूरस्थितीची पाहणी केली. मंगळवारी सकाळी आ. राजन साळवी यांनी जवाहर चौक, बाजारपेठ भागात फिरून व्यापार्‍यांशी संवाद साधला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news