Kashedi Tunnel : हलक्या वाहनांसाठी कशेडी बोगदा सोमवार पासून खुला होणार  | पुढारी

Kashedi Tunnel : हलक्या वाहनांसाठी कशेडी बोगदा सोमवार पासून खुला होणार 

समीर बुटाला, पोलादपूर : कोकणातील मुंबई – गोवा या राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटाला आता बोगद्यातील वाहतुकीचा पर्याय लवकरच उपलब्ध होणार आहे. येत्या सोमवारी (दि.११ सप्टेंबर) एक बोगदा हलक्या वाहनांसाठी सुरू करण्यात येणार आहे. खेड ते पोलादपूर कडे येणारा बोगद्यातीळ काम ९० टक्के पूर्णत्वास गेले आहे. तर उर्वरित काम युद्ध पातळीवर सुरू आहे. सदरची मार्गिका खुली होणार असल्याने प्रवासी वर्गाचा घाटातील प्रवासाचा वनवास संपणार आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री यांनी सदरचा बोगदा गणपती पूर्वी खुला करण्याचे आदेश महामार्ग विभाग व संबधीत ठेकेदार यांना दिले होते. (Kashedi Tunnel)

 ऑक्टोबर २०२३ अखेरपर्यंत संपूर्ण  बोगद्याचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे.  तर या पावसाळ्याच्या सुरुवातीलाच  या बोगद्यातून एक लेन वाहतुकीसाठी खुली केली जाणार होती, मात्र या भागात मुसळधार पावसाचे स्वरूप पाहता अनेक कामात अडथळा निर्माण झाला होता मात्र अत्याआधुनिक यंत्रणा वापरात १ मार्गिका खुली करण्यात महामार्ग विभाग व ठेकेदार यांना यश आले. त्यामुळे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी ही एक सुखद बाब आहे.

Kashedi Tunnel : नऊ किलोमीटरचा मार्ग

    या बोगद्यातील  सगळ्या कामावरती केंद्र सरकारने नियुक्त केलेली आयएलएफ कन्सल्टंट ही कंपनी या कामावरती सुरुवातीपासून सुपरवायझिंग करत आहे. हे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व ही कन्सल्टिंग कंपनी यांच्या समन्वयातून सुपरवायझिंग व तंत्रज्ञान, तांत्रिक मार्गदर्शनाचे काम समन्वयातून सुरू आहे. हा बोगदा एकूण दोन किलोमीटरचा असून या बोगद्याला असलेले रस्ते धरून हा सगळा मार्ग नऊ किलोमीटरचा आहे.

Kashedi Tunnel
Kashedi Tunnel

अवजड वाहनांच्या वाहतुकीचा वेळ वाचणार

 या बोगद्यामुळे भविष्यात अवजड वाहनांच्या वाहतुकीचा वेळ वाचणार आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरती असलेल्या कशेडी घाटातील चौपदरीकरणाचे काम या बोगद्यामुळे उत्तम पर्याय देत पूर्णत्वाकडे जात आहे. तत्कालीन पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या पुढाकाराने केंद्र शासनाच्या सहकार्याने हे काम त्यावेळी मंजूर करून तात्काळ हाती घेण्यात आलं होते. बोगद्याचे काम रिलायन्स ईंन्फ्रा या कंपनी करत असून उप कंपनी म्हणून एसडीपीएल ही कंपनी काम करत आहे. २०१८ साली या बोगद्याचे काम सुरू करण्यात आलं  २०२३ च्या शेवटच्या टप्यापर्यंत हे काम शंभर टक्के पूर्ण करण्यात येईल, असे उद्दिष्ट प्रशासनाकडून ठेवण्यात आल आहे.

Kashedi Tunnel : पर्यटकांनाही फायदा 

 कशेडी घाटाच्या पायथ्याशी दरेकरवाडीनजीक डोंगरात खेडच्या बाजूने काही अंतराच्या टप्प्यात हे काम सुरू करण्यात आले होते. महामार्ग ते बोगदा जोडणाऱ्या पुलांचे कामदेखील पूर्णत्वास गेले आहे. करोना कालावधीत हे काम रखडलं होते. मात्र आता कामाने पुन्हा गती घेतली होती. कशेडी घाटाचे सौंदर्य पाहण्यासाठी कोकणात येणारे पर्यटक आता या बोगदा वाहतुकी मार्गे आगामी कालावधीत बोगद्यातून येऊ शकतील त्यासाठी चौपदरीकरणा नंतरदेखील घाटरस्ता सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी खेड व महाड स्थानिक बांधकाम विभागाची राहणार आहे. बोगद्याची २० मीटर रुंदी आणि ६.५ मीटर उंची आहे. भोगावे, कातळी व कशेडी या तीन गावांमधून या बोगद्याचा मार्ग जातो.

 या बोगद्याच्या महत्त्वाच्या कामासाठी एकूण ४४१ कोटींचा खर्च अपेक्षित ठेवण्यात आला आहे. हा बोगदा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तीन पदरी होणार असून, दोन भुयारी मार्ग असतील. नियोजनानुसार ७.२ किलोमीटर लांबीचा आधुनिक दर्जाचा हा पक्का रस्ता बोगद्याच्या कामात प्रस्तावित आहे. बोगद्यात हवा खेळती रहावी यासाठीही वायूविजन भुयार बोगद्याच्या रचनेत समाविष्ट आहे. या बोगद्यात सहा ठिकाणी जोड रस्ते असून, बोगद्यात यू टर्नची व्यवस्था आहे. अपघातग्रस्त वाहनांना बाहेर काढण्याची आपत्कालीन सुविधासुद्धा ठेवण्यात येणार आहे.

हेही वाचा 

Back to top button