रायगड : चेतक कंपनीच्या कार्यालयाची मनसैनिकांकडून तोडफोड | पुढारी

रायगड : चेतक कंपनीच्या कार्यालयाची मनसैनिकांकडून तोडफोड

माणगांव, पुढारी वृत्तसेवा :  पनवेल येथे झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या निर्धार मेळाव्यानंतर रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्ग कामाच्या संदर्भात रायगड जिल्ह्यातील मनसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेण्याची सुरुवात केली आहे. याचे प्रथम पडसाद माणगाव तालुक्यात उमटले आहेत. इंदापूर ते लाखपाले माणगांव बायपासचे काम करणाऱ्या चेतक इंटरप्रायझेस अंतर्गत सनी कन्स्ट्रक्शन कंपनीच्या गणेश नगर माणगांव येथील कार्यालयाच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये मनसे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष देवेंद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली माथाडी कामगार सेना अध्यक्ष संजय गायकवाड, चिमण सुखदरे या कार्यकर्त्यांनी खुर्च्या आणि फर्निचर समानाची तोड फोड केली. या घटने नंतर आंदोलनकर्ते फरार झाले आहेत.

 मनसे पदाधिकारी आणि चेतक इंटरप्रायझेस अंतर्गत सनी कन्स्ट्रक्शन कंपनीच्या अधिकाऱ्यांची चेतक कंपनीच्या अधिकाऱ्यांशी बैठक सुरू होती. याच दरम्यान इंदापूर ते लाखपाले टप्प्यातील कंपनीकडून कूर्मगतीने होणारे काम रखडले.  माणगाव शहरात सततच्या होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे आक्रमक पवित्रा घेत मनसेचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष देवेंद्र गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी कंपनी कार्यालयाच्या कॉन्फरन्स हॉल मधील खुर्च्या फर्निचर आणि सामानाची आदळ आपट करून तोड फोड केली.  यामुळे चेतक कंपनी प्लांटच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. सदर आक्रमक पवित्रा आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार घेतला असल्याचे मत मनसे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष देवेंद्र गायकवाड यांनी बोलताना सांगितले आहे.

माणगांव येथील या कन्स्ट्रक्शन कंपनीच्या कार्यालय तोडफोड प्रकरणाची दखल महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी घेतली आहे. या संदर्भात मंत्री रविंद्र चव्हाण यांनी रायगडचे पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली व कार्यालयाची तोडफोड करणाऱ्या संबंधित व्यक्तींविरुद्ध तातडीने गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

हेही वाचलंत का?

Back to top button