रायगड; पुढारी वृत्तसेवा : भारतीय सेनादलाच्या सदर्न कमांडतर्फे आखल्या गेलेल्या एका आगळ्या वेगळ्या उपक्रमात यंदाच्या स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्ट २०२३ रोजी, सदर्न कमांडच्या आखत्यारीत येणाऱ्या राज्यांपैकी सुमारे ६ राज्यांमधील ७५ गडकोटांवर एकाच वेळी तिरंगा फडकावला गेला. त्यापैकी तब्बल ४९ गडकिल्ले हे महाराष्ट्रातील होते. साहस आणि देशप्रेमाने भारलेल्या अशा एका अतिशय अनोख्या उपक्रमात, भारतीय सेनादलातील अधिकारी व जवानांबरोबर छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गडांवर जाऊन तिरंगा फडकवण्याचा व स्वातंत्र्यदिन साजरा करण्याचा अनुभव महाराष्ट्रातील ३०० हून अधिक साहसप्रेमींनी घेतला. (Independence Day)
या उपक्रमाचे समन्वय करण्यासाठी महाराष्ट्रातील आघाडीच्या 'गिरिप्रेमी' या गिर्यारोहण संस्थेने सदर्न कमांडला सहकार्य केले. तसेच उपक्रमाला प्रतिसाद म्हणून महाराष्ट्रातील सर्व भागातून गिर्यारोहकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या उपक्रमाअंतर्गत स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर हा उपक्रम सेना दलाच्या AAD अर्थात आर्मी एअर डिफेन्सच्या कॅप्टन अक्षय सिंग यांच्या नेतृत्वाखालील १८ जवान, पोलीस उप निरीक्षक सुनील अवसरमल, हरिश्चंद्र पाटील, महाड मधील सह्याद्री मित्रसंस्थेचे ८ गिर्यारोहक, पुरातत्व खात्याचे गार्ड यांच्या उपस्थितीत पार पडला.
हेही वाचा