

कुडाळ, पुढारी वृत्तसेवा : माणगांव खोर्यातील जयप्रकाश नारायण विद्यालय, वाडोस मधील शिपाई सिताराम जानू जानकर यांना शाळेत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप पदाधिकारी राजाराम धुरी, वाडोस उपसरपंच लक्ष्मण उर्फ संजय देसाई यांच्यासह अन्य ६ जण जणांवर कुडाळ पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद शिपाई सिताराम जानकर यांनी कुडाळ पोलिस स्थानकात दिली आहे.
अधिकची माहिती अशी की, बुधवारी (दि. ९) सकाळी ११.३० वा.च्या सुमारास आपण हायस्कुलमध्ये असताना वाडोस गावातील संदिप म्हाडगुत, लक्ष्मण उर्फ संजय देसाई, प्रविण उर्फ बाबल्या म्हाडगुत, सुर्यंकात धुमक, राजाराम धुरी व गोठोस गावातील सुरज कदम, सुधाकर नाईक, आनंद सावंत व अन्य अनोळखी पाच महिला अशी माणसे शाळेत आली. मुख्याध्यापक भरत सराफदार यांना विचारणा केली कि, तुमच्या शाळेत शिपाई म्हणून कामाला असलेले सिताराम जानकर यांनी गोठोस गावात येणारी एसटी बस बंद केलेली आहे.
याबद्दल आम्ही त्यांना जाब विचारायला आलो आहोत. यावेळी मुख्याध्यापक श्री. सराफदार यांनी त्यांना बसण्याची विनंती केली. त्यानंतर मुख्याध्यापक सराफदार यांनी शिपाई सिताराम जानकर यांना बोलावले. यावेळी संस्थाध्यक्ष सुभाष भिसे, मुख्याध्यापक श्री. सराफदार, शिक्षक आनंद राठये, शिपाई विजय चव्हाण आदि उपस्थित होते. यावेळी जमावाने आलेल्या व्यक्तींनी गोठोस गावात येणारी एसटी बस का बंद केली? तुच एसटी बंद केली, हे आम्ही पुराव्यानिशी दाखवुन देवू, असे म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली. अधिक तपास माणगाव पोलिस स्थानकाचे पोलिस भोई करीत आहेत.