नितीन गडकरी : महामार्गाचे काम दीड वर्षात पूर्ण करणार | पुढारी

नितीन गडकरी : महामार्गाचे काम दीड वर्षात पूर्ण करणार

अलिबाग/मडगाव ; पुढारी वृत्तसेवा : गेली 15 वर्षे रखडलेला मुंबई-गोवा महामार्ग दीड वर्षात पूर्ण करणार, अशी घोषणा केंद्रीय दळण-वळणमंत्री नितीन गडकरी यांनी गोव्यात बोलताना केली आहे. या घोषणेमुळे गेली अनेक वर्षे त्रस्त असलेल्या कोकणातील प्रवाशांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

गोव्यात सुरू असलेल्या महत्त्वाच्या कामांपैकी एक म्हणजे मुंबई-गोवा रस्ता बांधकाम पुढील वर्षापर्यत पूर्ण करण्यावर भर देण्यात येत आहे, अशी माहिती केंद्रीय महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी दक्षिण गोव्यातील वेर्णा येथे सोमवारी दिली. ते म्हणाले, की हा रस्ता गोवा तसेच महाराष्ट्रासाठीही महत्त्वाचा ठरणार आहे. रस्ता बांधण्यासाठी सुमारे 11 हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून हा रस्ता पूर्ण झाल्यावर गोवा, कर्नाटक व महाराष्ट्राचा प्रवास सुखद होणार आहे.

मुंबई-गोवा महामार्ग रायगड जिल्ह्यात पळस्पे ते इंदापूर हा 15 वर्षांपूर्वी सुरू झालेला कामाचा टप्पा आजही प्रलंबित आहे. मधल्या काळात दोनवेळा ठेकेदार कंपन्या बदलण्यात आल्या. तरीही कामाला वेग मिळालेला नाही. इंदापूर ते वाकण फाटा रस्त्याची प्रचंड दुरवस्था आहे. त्याचबरोबर वाकण फाटा ते वडखळ येथील काम देखील मोठ्या प्रमाणात अपुरे आहे. वडखळ नाका ते फळस्पे येथील 90 टक्के काम झाले असले तरी 10 टक्के न झालेल्या कामामुळे वाहतुकीस अनेक अडथळे येत आहेत. या पहिल्या टप्प्यातील अपुर्‍या कामासाठी 250 कोटी रुपये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंजूर केले आहेत. प्रामुख्याने सुकेळी खिंडीमध्ये रुंदीकरणाचे काम अडकलेले आहे. हे काम पुढील वर्षभरात पूर्ण करण्याचे

निर्देश ठेकेदार कंपनीला दिले आहेत. त्यापुढील टप्पा इंदापूर ते पोलादपूर हा जवळपास 60 किलोमीटरचा टप्पा आहे. त्यामध्ये कशेडीचा सहा कि.मी.चा बोगदा समाविष्ट आहे. इंदापूर ते माणगाव बायपास रखडलेला आहे. माणगाव ते महाड जवळपास 30 टक्के काम झाले आहे तर 70 टक्के काम अद्याप बाकी आहे. बोगद्याचे काम 80 टक्के झाले असून हा टप्पा दीड वर्षात पूर्ण करायचा असेल तर आतापासूनच वेगाने काम सुरू करावे लागणार आहे. सद्यस्थितीत या मार्गाचे काम ठप्पच आहे. याशिवाय महाड पुराला महामार्गाच्या उड्डाणपुलाच्या भिंती कारणीभूत ठरल्याने या भिंतींचे काय करायचे, हाही एक प्रश्न आहे.

त्यानंतरचा टप्पा रत्नागिरी

जिल्ह्यातील येत असून खेड ते लांजा या जवळपास 130 किमीच्या मार्गाचे काम जवळपास ठप्पच आहे. या मार्गावरील ठेकेदार कंपन्या काम करित नसल्याने त्या ब्लॅकलिस्टला गेल्या आहेत. हा टप्पा पूर्ण करण्याचे मोठे आव्हान आता सरकार समोर असणार आहे. महामार्गावर टोलनाकी उभी झाली मात्र महामार्गाचे काम रखडलेलेच आहे.

जवळपास 100 किमीवर एक टोल नाका असे टोलनाके उभे करण्यात आले आहेत. लांजा ते सावंतवाडी हा टप्पा जवळपास पूर्ण होत आला आहे. 15 टक्के काम बाकी असून प्रामुख्याने रत्नागिरी व रायगड जिलह्यातील काम कळीचा मुद्दा ठरत आहे. हे काम दिड वर्षांत पूर्ण झाले तर किमान 2022 पर्यंत तरी या महामार्गावर नियमित वाहतूक सुरु होऊ शकणार आहे.

सध्या हा महामार्ग अपघात महामार्ग म्हणूनच ओळखला जात आहे. अपूर्‍या कामामुळे जवळपास 2000 पेक्षा अधिक अपघात झाले आहेत. 700 पेक्षा जास्त लोकांना प्राण गमावावे लागले आहेत. हा महामार्ग पूर्ण झाल्यास मुंबई ते सिंधूदूर्ग हा प्रवास सात तासात होऊ शकणार आहे. सद्यस्थितीत या प्रवासाला 17 ते 18 तास लागत आहेत. गडकरी यांच्या घोषणेमुळे हा महामार्ग लवकरच पूर्ण होईल अशी आशा कोकणवासीयांमध्ये निर्माण झाली आहे.

Back to top button