रत्नागिरी जिल्ह्यात धुवाँधार; नद्या धोका पातळीवर | पुढारी

रत्नागिरी जिल्ह्यात धुवाँधार; नद्या धोका पातळीवर

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा :  जिल्ह्यात जोरदार पावसाचे धूमशान सुरू असून पावसाचा जोर गुरुवारीही कायम होता. जिल्ह्याच्या सर्वच तालुक्यांना पावसाने झोडपून काढले. जिल्ह्यातील प्रमुख नद्यांपैकी बहुतांश नद्यांच्या जलस्तरात वाढ झाल्याने खेड, मंडणगड, दापोली, चिपळूण आणि राजापूर तालुक्यात पूरसद़ृश स्थिती निर्माण केली. शुक्रवारी जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.

रत्नागिरी तालुक्यातील चांदेराई बाजारपेठ आणि सोमेश्वर येथे काजळी नदीचे पाणी वाढल्याने जनजीवन विस्कळीत झाले. मुंबई-गोवा महामार्गावर निवळी येथे गुरुवारी सकाळी दरड कोसळल्याने या रस्त्यावरील वाहतूक बंद होती. दीड तासाने दरड हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असल्याने कोकण किनारपट्टी भागात आगामी तीन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात रेड तर ठाणे, पालघर, रायगड, आणि सिंधदुर्ग जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, तसेच अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होऊ नये, यासाठी प्रशासनाने गुरुवारी शाळांना सुट्टी जाहीर केली होती. जिल्ह्यातील प्रमुख नद्यांतील जलस्तर धोका पातळीकडे सरकू लागला आहे. खेड तालुक्यातील जगबुडी नदीने धोका पातळी ओलांडली आहे.

संगमेश्वर येथील शास्त्री नदी, सोनवी नदी, बावनदी; राजापूर येथील कोदवली, लांजातील काजळी या नद्यांनी गुरूवारी दुपारी 12 वाजताच्या नोंदीनुसार इशारा पातळी ओलांडली होती. जिल्ह्यात अनेक भागात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने नद्यांच्या परिसरातील गावांमध्ये सावधगिरीच्या सूचना प्रशासनाने केल्या आहेत. पावसाच्या सरासरीने 18 हजार मि.मी.ची मजल गाठली आहे. गतवर्षी याच कालवधीत 1700 मि.मी.च्या सरासरीने एकूण 15 हजार मिमी पाऊस झाला होता. यावर्षी जुलै अखेरिस पावसाने गतवर्षाची सरासरी ओलांडली आहे.

रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक पाऊस

गुरुवारी जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांना पावसाने झोडपून काढले. एकाच दिवसात जिल्ह्यात पावसाने सव्वाशे मि.मी. च्या सरासरीने 1300 मि.मी.ची एकूण बरसात केली. रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली. मंडणगड तालुक्यात 151 मि.मी., दापोलीत 132 मि.मी., खेड 115 मि.मी., गुहागर 143 मि.मी., चिपळुणात 132 मि.मी., संगमेश्वर तालुक्यात 157 मि.मी., रत्नागिरी तालुक्यात 177 मि.मी., लांजात 169 मि. मी., राजापूर तालुक्यात 118 मि. मी. पावसाची नोंद झाली.

Back to top button