रत्नागिरी : खेड येथील पुरात अडकलेल्या नागरिकांचे स्थलांतर सुरू | पुढारी

रत्नागिरी : खेड येथील पुरात अडकलेल्या नागरिकांचे स्थलांतर सुरू

खेड; पुढारी वृत्तसेवा : येथील बाजारपेठेला पुराच्या पाण्याचा वेढा पडला असून पुरातून अडकलेल्या नागरिकांना होडीतून सुरक्षित स्थळी नेण्याचे काम सुरू आहे. जगबुडी नदीने १०.८० मीटर पातळी पार केली असून पावसाचा जोर कायम आहे. अलसुरे गावाला पुराने वेढले असून तेथील नागरिकांनांही सुरक्षित स्थळी नेण्यात येत आहे. अनेक ठिकाणी ग्रामीण रस्ते रहदारीस बंद झाले आहेत.

खेड तालुक्यातील बोरघर कातकरी वस्ती, शहरातील खांबतळे येथील झोपडपट्टी मधील रहिवासी, जगबुडी भोस्ते पुलाजवळील झोपडपट्टीवासियांना स्थलांतरित करण्यात आले आहे. भोस्ते गावातील रस्त्यावर जगबुडी नदीचे पाणी आल्याने भोस्ते-अलसुरे वाहतूक बंद आहे. अलसुरे येथील मशिदीतून भोंग्यावरून नागरिकांना सतर्क राहणेचे आवाहन करण्यात येत आहे. नदी किनाऱ्यावरील नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करणे चालू आहे. खेड शहरातील मच्छी मार्केट भागात पुराचे पाणी भरले आहे. तेथील दुकानदारांनी दुकाने बंद करून सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले आहे. नारिंगी नदीचे पुराचे पाणी कन्या शाळा व योगिता दंत महाविद्यालय जवळ रस्त्यावर आले असल्याने दापोली खेड रस्ता वाहतुकीस बंद झाला आहे. अत्यावश्यक सेवेसाठी सातेरे जामगे मार्गे मंडणगड तर्फे दापोली या पर्यायी मार्गाने प्रवास करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

आंबवली येथील धनगरवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याला भेगा पडल्या असून रस्त्यांवर झाड पडले आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून रस्ता वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. खारी गावात पुराचे पाणी येण्याची शक्यता असल्याने शेजारील घरात ४ कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे. शहरातील गांधी चौक, डेंटल कॉलेज, नगर परिषद दवाखाना रोड याठिकाणी पुरच्या पाण्याची पातळी ४ फुटा पेक्षा जास्त आहे. त्या ठिकाणी तलाठी , पोलीस व नगर परिषद कर्मचारी यांची पथके तैनात करण्यात आली आहेत. नगर परिषद हद्दीत ५ बोटी खेड शहरात तैनात असून अलसुरे येथे १ बोट तैनात करण्यात आली आहे. तेथील नारिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. आतापर्यंत खेड परिषद हद्दीतील ३५ कुटुंबातील ८० सदस्यांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे. अलसुरे ग्रामपंचायतीसमोर असणाऱ्या रस्त्यावर पुराचे पाणी आल्याने असलुरे गावचा संपर्क तुटला आहे. तळवटखेड व तळवट जावळी यांना जोडण्याऱ्या पुलावरून पूराचे पाणी जात असल्याने पांधरागाव परिसराचा खेड तालुक्याशी संपर्क तुटला आहे.

Back to top button