रत्नागिरी : ‘सेतू’ अभ्यासक्रमाचा पुन्हा एकदा घाट | पुढारी

रत्नागिरी : ‘सेतू’ अभ्यासक्रमाचा पुन्हा एकदा घाट

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा :  ऑनलाईन शिक्षणामुळे ढासळलेली शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी दुसरी के दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सेतू अभ्यासक्रम हा उपक्रम राबवण्यात आला होता. मागील वर्षापासून सुरळीत शिक्षण सुरु असतानाही परीक्षा मंडळाने यावर्षी देखील सेतू अभ्यासक्रमाचा घाट घातला आहे. नवीन शैक्षणिक अभ्यासक्रमांचा वेळ उजळणीत खर्ची पडत असल्याने शिक्षक, विद्यार्थी व पालकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

कोरोना काळात शाळा बंद राहिल्याने शैक्षणिक नुकसान विद्यार्थ्यांचे टाळण्यासाठी ऑनलाईन शिक्षण सुरु होते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेबाबत साशंकता निर्माण झाली होती. त्यातच राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण अहवालामध्ये भाषा, गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र या विषयांमध्ये विद्यार्थ्यांचा पाया कच्चा असल्याचे समोर आले होते. या सर्वांचा परिणाम शालेय गुणवत्तेवर होत असल्याने राज्यस्तरावर शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभीच सेतू अभ्यासक्रम शिकवण्यात आला. इयत्ता दुसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी, इंग्रजी सामान्य विज्ञान, गणित, सामाजिकशास्त्र या विषयांसाठी हा सेतू अभ्यासक्रम तयार करण्यात आला होता. हा अभ्यासक्रम विषयनिहाय आणि इयत्तानिहाय महत्त्वाच्या क्षमतांवर आधारित होता. मात्र गेल्या दोन वर्षापासून सुरळीतपणे शाळा व शिक्षण सुरु असतानाही नवीन शैक्षणिक वर्षात पुन्हा सेतू अभ्यासक्रमाचा घाट घालण्यात आला आहे. सेतू अभ्यासक्रमाचा पहिला टप्पा पार पडला असून त्यामध्ये जिल्ह्यातील 2400 प्राथमिक व 350 शाळांमध्ये इयत्ता दुसरी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची पूर्व चाचणी घेण्यात आली. सुमारे पंधरा दिवसांचा सेतू अभ्यासक्रम असून शालेय कामकाजाच्या दिवसातच हा अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे. त्यानंतर उत्तर चाचणी घेतली जाणार आहे.

मागील वर्षातील अभ्यासक्रमाच्या उजळणीत वेळ जाणार असल्याने नवीन शैक्षणिक व नुकसानच ठरणार आहे. त्यातच मागील दोन वर्षे नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभीच शिक्षक व विद्यार्थ्यांना सेतू अभ्यासक्रम सुरू करण्यापूर्वी सूचना दिल्या गेल्या होत्या. मात्र या वर्षी नवीन शैक्षणिक वर्ष सुरु झाल्यानंतर सेतू अभ्यासक्रमाचे नियोजन केल्यामुळे परीक्षा मंडळाकडून वराती मागून घोडे नाचवण्यात येत असल्याने शिक्षक व विद्यार्थी, पालकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

नवीन शैक्षणिक वर्षातील अभ्यास की मागील उजळणी?

सेतू अभ्यासक्रमांतर्गत प्रत्येक इयत्ता व विषयानुसार विद्यार्थ्यांना स्वखर्चाने या कृतिपत्रिकेच्या झेरॉक्स मारुन घेण्यासाठी आर्थिक भुर्दंड पालकांना बस आहे. मागील दोन वर्षांत सेतू अभ्यासक्रमातून गुणवत्ता वाढवलेल्या विद्यार्थ्यांनी आता नवीन अभ्यासक्रम शिकायचा का मागील उजळणी करायची? असा सवाल विद्यार्थ्यांमधून उपस्थित केला जात आहे.

Back to top button