चिपळूण; पुढारी वृत्तसेवा : आज अख्खा देश आपल्याला हसत आहे. महाराष्ट्रात काहीही केलं तरी लोक निवडून देतात. आपण काँग्रेसशी युती करणार नाही. मात्र, आज राष्ट्रवादी काँग्रेस वेगळी आहे का? त्यामुळे अशी घाणेरडी, अभद्र युती, आघाडी करण्याची वेळ आली तर आपण घरी बसू. आज सरडेही लाजतील, अशी महाराष्ट्राच्या राजकारणाची अवस्था झाली आहे, अशी टीका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी चिपळुणातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केली. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मिमिक्री देखील करून दाखविली आणि कार्यकर्त्यांना संघटनात्मक काम करा, असे आवाहन केले.
चिपळुणात मनसेच्या शहर कार्यालयाचे उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्यानंतर त्यांनी महामार्गालगच्या अतिथी ग्रॅन्ड सभागृहात जिल्ह्यातील मनसे कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. यावेळी मनसेचे नेते नितीन सरदेसाई, शिरीष सावंत, अविनाश जाधव, सरचिटणीस वैभव खेडेकर, अविनाश सौंदळकर, जिल्हा सचिव संतोष नलावडे, राजेंद्र खेतले, जितेंद्र चव्हाण, अमर साळुंखे आदींसह जिल्ह्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी राज ठाकरे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना खडेबोल सुनावले. ते म्हणाले, आपण आपला इतिहास, वर्तमान आणि भविष्य विसरलो आहोत का? इथल्या माणसाने सव्वाशे वर्षे महाराष्ट्रावर राज्य केले. आपण लोकांना परंपरा, संस्कृती शिकविली. त्यामुळे कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राप्रती प्रेम वृद्धींगत करावे. आघाडी, युती करायची वेळ आल्यास ती आपण कदापि करणार नाही. एकवेळ घरी बसून राहू, पण असला अभद्रपणा चालणार नाही, अशा शब्दांत त्यांनी सुनावले. कार्यकर्त्यांनी आता कामाला लागावे. दरमहा तुमच्या कामाचे मूल्यमापन होईल. किती लोकांकडे संपर्क केला याची माहिती घेतली जाईल आणि काम योग्य न वाटल्यास बदलाचा निर्णय देखील घेतला जाईल. त्यामुळे आधी सांगितले नव्हते, असे तेव्हा म्हणू नका, अशा शब्दांत कार्यकर्त्यांना देखील इशारा दिला.
ठाकरे म्हणाले, सी. डी. देशमुख यांच्यानंतर एकही नाव घ्यावा, असा खासदार आजपर्यंत जन्माला आला नाही. सोळा वर्षांत मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण होत नाही. एखाद्यातरी खासदाराने या महामार्गाविषयी प्रश्न उपस्थित केला का? कोकणातील एकतरी खासदार केेंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यापर्यंत गेला का? तर कशासाठी खासदारकीच्या निवडणुका लढविता? अन्यत्र बघा एखाद्या प्रश्नावर सर्व मतभेद बाजूला ठेवून आमदार, खासदार एकत्र येतात. मात्र, कोकणातील निवडून दिलेला एकतरी खासदार महामार्गाच्या प्रश्नावर बोलला का? असा सवाल त्यांनी केला.
यापुढे पक्षाच्या चौकटीत राहूनच काम करावे लागेल. जो काम करणार नसेल त्याला बाजूला केले जाईल. सध्याच्या राजकारणाबाबत आपल्या मनातील राग बाहेर काढण्यासाठी आपण लवकरच मुंबईमध्ये मेळावा घेणार आहोत आणि त्यावर बोलणार आहोत. त्यावेळी सर्वांनी या, असे आमंत्रणही राज ठाकरे यांनी उपस्थितांना दिले.
सभेनंतर पत्रकारांशी बोलताना राज ठाकरे म्हणाले, आज संघटनात्मक बांधणीसाठी आलो आहे. कार्यकर्त्यांशी चर्चा करतोय, असे सांगितले. त्यानंतर उद्धव व राज ठाकरे एकत्र येणार का? असा प्रश्न विचारल्यानंतर राज ठाकरे 'हा हा हा' असे हसले. त्यामुळे त्यांच्या या हसण्यामागे काय दडले आहे, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.