रत्नागिरी : उंच कड्यावरून कोसळणारा ‘सवतसडा’..! | पुढारी

रत्नागिरी : उंच कड्यावरून कोसळणारा ‘सवतसडा’..!

चिपळूण; पुढारी वृत्तसेवा :  मुंबई-गोवा महामार्गालगत पेढे येथे दरवर्षी पावसाळ्यात वाहणारा सवतसडा धबधबा आता ओसंडून वाहू लागला आहे. त्यामुळे या ठिकाणी पावसाळी पर्यटनासाठी गर्दी होऊ लागली आहे. महामार्गावरून प्रवास करणारे मुंबई, पुण्यातील प्रवासी तसेच स्थानिक आणि महाविद्यालयीन युवक या ठिकाणी चिंब भिजण्यासाठी गर्दी करीत आहेत. धबधब्याखाली भिजण्यासाठी एक सुरक्षित ठिकाण म्हणून सवतसडा धबधबा आकर्षण ठरला आहे.

या वर्षी या भागात चौपदरीकरणाचे काम मार्गी लागले आहे. त्यामुळे महामार्गावरून प्रवास करणार्‍या लोकांना सवतसडा धबधब्याचे विहंगम द़ृश्य पाहताना या ठिकाणी थांबण्याचा मोह आवरत नाही. त्यामुळे अनेक प्रवासी या ठिकाणी थांबूनच पुढच्या प्रवासाला निघतात. येथे मिळणारा गरमागरम भाजका मका, उकडलेल्या भुईमुगाच्या शेंगा, आल्याचा चहा चिंब भिजल्यावर आस्वाद पर्यटक घेतात. त्यामुळे स्थानिकांनादेखील रोजगार उपलब्ध झाला आहे.

गेले काही दिवस पावसाने जोर धरल्याने सवतसडा धबधबा फेसाळून वाहत आहे. सुमारे तीस ते पस्तीस फूट उंचीवरून फेसाळत कोसळणारा धबधबा आकर्षण ठरला आहे. महामार्गालगत 500 मीटरवर असल्याने येथे पर्यटकांची गर्दी असते. या शिवाय शहर व ग्रामीण भागातील लोक सहकुटुंब धबधब्याची मजा घ्यायला येतात. या शिवाय परजिल्ह्यातील पर्यटकांचादेखील येथे ओढा असतो. जवळच असणारे परशुराम मंदिर, वाशिष्ठी दर्शन विसावा पॉईंट यामुळे वर्षा सहलीसाठी हे ठिकाण प्रसिद्ध झाले आहे.

Back to top button