कोकणात तीन दिवस अतिमुसळधार पाऊस | पुढारी

कोकणात तीन दिवस अतिमुसळधार पाऊस

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा :  मुंबईपासून केरळच्या संपूर्ण किनारपट्टीवर ढगांची दाटी झाली आहे. त्यामुळे संपूर्ण कोकण किनारपट्टीसह उर्वरित महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे. त्यानुसार हवामान विभागाने रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे 7 ते 9 जुलै या कालावधीत मुंबईसह पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, कोल्हापूर, सातारा, ठाणे, पालघर, नाशिक, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांना ‘ऑरेंज अ‍ॅलर्ट’ दिला आहे. पुढील पाच दिवस राज्याच्या बहुतेक भागात पावसाचा जोर राहणार आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार कोकणात पाऊस पडण्यास पोषक वातावरण आहे. बुधवारी रात्री, गुरूवारी सकाळपासूनच पावसाचा जोर रत्नागिरी जिल्ह्यात वाढला होता. अनेक भागात जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. गुरुवारी अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट होता. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाच्या जोरदार सरींमध्ये सातत्य होते. त्यानुसार प्रशासनानेही खबरदारीच्या उपाय योजना म्हणून नागरिकांना आवाहन केले होते.

रत्नागिरी जिल्ह्यात बुधवारी 47.44 मि. मी. च्या सरासरीने 427 मि. मी. पाऊस झाला. यामध्ये राजापूर तालुक्यात सर्वाधिक म्हणजे 143 मि. मी. पावसाची नोंद झाली. लांजा तालुक्यात 50 मि. मी., संगमेश्वर 49, मंडणगड आणि चिपळूण तालुक्यात प्रत्येकी 36, गुहागर तालुक्यात 34, रत्नागिरी तालुक्यात 31 आणि दापोली तालुक्यात 26 मि.मी. पावसाची नोंद झाली. आतापर्यंत जिल्ह्यात साडेसातशे मि.मी.च्या सरासरीने 6799 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

दि. 7, 8 व 9 जुलै या कालावधीत जिल्ह्यातील काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. या अलर्टच्या अनुषंगाने संबंधित यंत्रणांनी सावधानतेच्या व सुरक्षिततेच्या द़ृष्टीने कार्यरत राहावे. तसेच नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Back to top button