कोकणात मुसळधार पावसाचा ‘अलर्ट’ | पुढारी

कोकणात मुसळधार पावसाचा ‘अलर्ट’

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा :  कोकण किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्रात पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस पडेल. काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. बुधवारपासून कोकण किनारपट्टीतील रायगड रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता असून, या जिल्ह्यात ‘ऑरेंज अलर्ट’ आठवडाभर कायम करण्यात आला आहे तर ठाणे आणि पालघर जिल्ह्याला जोरदार पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.

दरम्यान, मंगळवारी जिल्ह्यात संततधार सुरूच होती. मोसमी पाऊस जुलै महिन्यात सक्रिय झाला आहे. आता पुढील 5 दिवस कोकण किनारपट्टी भागात जोरदार मुसंडी मारण्यासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. कोकण किनारपट्टीपासून केरळच्या किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. बंगालचा उपसागरात आणि अंदमान बेटाजवळ वार्‍याची चक्रीय स्थिती तयार झाली आहे. ही स्थिती मोसमी पावसाला जोरदार सक्रिय करण्यास पोषक ठरणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्रात पुढील 5 दिवस मुसळधार पाऊस पडेल तर काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

गेला आठवडाभर पावसाने रत्नागिरी जिल्ह्यात जोरदार सातत्य राखले आहे. मंगळवारी जिल्ह्यात संततधार सुरूच होती. मंगळवारी संपलेल्या 24 तासात जिल्ह्यात 59 मि. मी. च्या सरासरीने 531 मि.मी. एकूण पाऊस झाला. यामध्ये मंडणगड दापोली या दोन तालुक्यात जोरदार पावसाची नोंद झाली. या तालुक्यात अनुक्रमे 101 आणि 125 मि.मी. पावसाची नोंद झाली. खेडमध्ये 81 मि. मी . पावासाची नोंद झाली. गुहागर तालुक्यात 60, चिपळूणमध्ये 28, संगमेश्वर 29, रत्नागिरी 54, लांजा आणि राजापूर तालुक्यात प्रत्येकी 22 मि.मी. पावसाची नोंद झाली.

रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत 68 मि.मी.च्या सरासरीने पावसाने सहा हजार मि. मी. ची मजल मारली आहे. दरम्यान, कोकण किनारपट्टी भागात जोरदार पावसाच्या शक्यत्येने किनारी भागासह दुर्गम भागात सावधगिरीच्या आणि सतर्कतेच्या सूचना प्रशासनातर्फे करण्यात आल्या आहेत.

ऑरेंज अलर्ट :  रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर.

यलो अलर्ट  :  ठाणे, पुणे, बीड, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर.

Back to top button