

चिपळूण, समीर जाधव : गेल्या तीन-चार वर्षांत महाराष्ट्रामध्ये कृषी क्षेत्रात तब्बल अडीच हजार स्टार्टअप आले. यामध्ये 50 टक्के आय.टी. इंजिनिअर्सचा सहभाग आहे. त्यामुळे कृषी क्षेत्रात ताकद आहे. फक्त शेतीकडे बघण्याचा द़ृष्टिकोन बदलला पाहिजे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून आगामी काळात हे विद्यापीठ शेतकर्याच्या बांधापर्यंत कसे पोहोचेल आणि लोकाभिमुख कसे होईल, याला आपण प्रथम प्राधान्य देऊ. तसा 'मास्टर प्लान' तयार होत आहे, असे उद्गार विद्यापीठाचे कुलगुरू आणि कोकणचे सुपुत्र डॉ. संजय भावे यांनी दै. 'पुढारी'शी बोलताना काढले.
कृषी दिनाच्या पार्श्वभूमीवर कुलगुरू डॉ. भावे यांची दै. 'पुढारी'च्यावतीने मुलाखत घेण्यात आली. यावेळी ते म्हणाले, दापोली येथील कृषी विद्यापीठात शिक्षण घेतलेला आणि या विद्यापीठात आपण प्राध्यापक व्हावे, असे स्वप्न पाहणारा आज या विद्यापीठाचा कुलगुरू झाला आहे, याचा अभिमान आहे. हा अनुभव विद्यापीठाच्या संशोधनासाठी निश्चितपणे उपयोगात येईल, असे ते म्हणाले. संशोधन क्षेत्रात काम करताना भुईमूग, कडधान्य, नाचणी, भात यावर आपण यशस्वी संशोधन केले.
कोकणातील पालघर, ठाणे, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यातील 45 तालुके आपण फिरलो आहोत. सर्वेक्षण व मूल्यमापन करून प्रत्येक जिल्ह्याची क्षमता काय, त्यासाठी कृषी आधारित काय बदल केले पाहिजेत, याबाबत लवकरच आराखडा तयार होणार आहे.
विद्यापीठाच्या स्थापनेनंतर ठाणे जिल्ह्यात विद्यापीठाचा विस्तार झालेला नाही. आपण अनेकवेळा त्याचा पाठपुरावा केला. विद्यापीठाला ठाणेमध्ये जागा द्यावी. तेथे संशोधन केंद्र किंवा कृषी महाविद्यालय उभारायचे आहे. तसेच अर्बन कृषी संशोधन केंद्राच्या माध्यमातून शहरामध्ये लागणारा भाजीपाला कसा निर्माण होईल, यावर संशोधन करायचे आहे. ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यात शासकीय कृषी महाविद्यालय नाही. त्यामुळे या ठिकाणी ते उभारण्याचा मानस आहे. आंबा, काजूवर चांगले संशोधन झाले. या पुढच्या काळात औषधी वनस्पती, जांभूळ, करवंदे, कोकम व अन्य कोकणी मेव्याचे सर्वेक्षण करून त्यावर काम करणार आहे.
विद्यापीठाच्या संशोधन आणि रँकिंगबाबत बोलताना ते म्हणाले, दापोली कृषी विद्यापीठ संशोधनात आघाडीवर आहे. मात्र, रँकिंगमध्ये मागे आहे. ते दहा विद्यापीठात कसे येईल , यासाठी आपला प्रयत्न राहील. रत्नागिरी-8 ही भाताची जात एका हेक्टरला सहा टन उत्पन्न देते. त्यामुळे हे भाताचे वाण महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र, छत्तीसगढ, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश या राज्यात जाते. वेंगुर्ला-4 ची दोन कोटी रोपे विद्यापीठाने विकली. ओरिसा ते व्हिएतनामपर्यंत त्याला मागणी आहे. आंब्यावर केलेले संशोधन तर सर्वांनाच माहीत आहे. परंतु काही अन्य निकषात कमी पडत असल्याने रँकिंग मागे येत आहे. मात्र, ही उणीव भरून काढू, असे त्यांनी विश्वासाने सांगितले.
शेती करायला मजूर मिळत नाहीत. त्यामुळे आता शेतीच्या यांत्रिकीकरणाकडे वळायला हवे आणि एकात्मिक शेती करून जास्तीत जास्त उत्पन्न मिळवायला हवे. शेती कला आणि विज्ञान आहे. पण, आता त्यामध्ये कॉमर्स आणायला हवे व मार्केटिंगचे तंत्र जोपासले तरच शेतीमध्ये सोने आहे हे लक्षात येईल, असे डॉ. भावे यांनी कृषी दिनाच्या पार्श्वभूमीवर सांगितले.
कॅप्सुल कोर्स तयार करणार…
कोरोनानंतर अनेक चाकरमानी तरूण गावाकडे आले व ते शेतीकडे वळले आहेत. त्यांना शेतीत रमविण्यासाठी विद्यापीठ कॅप्सुल कोर्स तयार करणार आहे. यामध्ये खेकडा संवर्धन, मधमाशी पालन यासारखे अनेक कोर्स असतील. सात-आठ दिवसांचे हे कार्स शिकून जिल्हा बँक त्यासाठी अर्थसहाय्य करील या पार्श्वभूमीवर लवकरच प्रत्येक तालुक्यात जिल्हा बँकेच्या माध्यमातून मेळावे आयोजित करण्यात येतील. कोकणातील ओसाड असलेल्या साडेसात लाख हेक्टरवर बांबूची लागवड झाली तर मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळू शकते. चार वर्षात बांबू पूर्ण वाढीसाठी तंत्रज्ञान विकसित झाले आहे. त्याचा शेतकर्यांनी लाभ घ्यावा, असेही कुलगुरु डॉ. भावे यांनी सांगितले.