सिंधुदुर्ग: लोकार्पण सोहळ्यात मडगाव – मुंबई वंदे भारत ट्रेनवर पुष्पवृष्टी | पुढारी

सिंधुदुर्ग: लोकार्पण सोहळ्यात मडगाव - मुंबई वंदे भारत ट्रेनवर पुष्पवृष्टी

मडगाव, गोवा: पुढारी वृत्तसेवा: मडगाव-गोवा येथे कोकण रेल्वेमार्गावरील बहुचर्चित वंदे भारत एक्स्प्रेसचा लोकार्पण सोहळा थाटात संपन्न झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोपाळ येथून व्हर्च्युअली मडगाव-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा कंदील दाखविला. त्यानंतर सकाळी ११.१० मिनिटांनी मडगाववरुन ट्रेन मुंबईच्या दिशेने दिमाखात रवाना झाली. यावेळी वंदे भारत ट्रेन वर पुष्पवृष्टी करण्यात आली.

यावेळी गोवा मडगाव जंक्शन येथील कार्यक्रमात व्यासपीठावर गोवा राज्याचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, गोवा राज्याचे पर्यटन मंत्री रोहन खौटे, राज्यसभेचे खासदार विनय तेंडुलकर, मडगावचे आमदार दिगंबर कामत, कोकण रेल्वेचे सीएमडी संजय गुप्ता आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, रेल्वे कनेक्टीव्हिटी नंतर आज गोव्यात मोठा एअरपोर्ट झाला आहे. रोड कनेक्टिव्हिटीमध्ये सुद्धा आम्ही आता पुढे आहोत. मोपा विमानतळ सुरू झाला म्हणून दाभोळी विमानतळ बंद होणार अशी भिंती काहींना आहे, असे काही होणार नाही, कुणी घाबरु नको. विमानसेवेत यापुढे २१ देशात थेट कनेक्टिव्हिटी होईल, त्यामुळे कुणीही घाबरून जाऊ नका, असे आवाहन सावंत यांनी केले.

गोवा राज्याचे पर्यटन मंत्री रोहन खौटे म्हणाले की, वंदे भारत एक्स्प्रेस ही ट्रेन गोवा राज्याच्या पर्यटन क्षेत्रासाठी मोठी कनेक्टिव्हिटी आहे. अनेक राज्यांमध्ये आमची कनेक्टिव्हिटी झाली आहे. आता या ट्रेनमुळे अधिकच फायदा होईल.

नामदार श्रीपाद नाईक म्हणाले की, या ट्रेनमुळे पर्यटकांची संख्या वाढेल, त्याचा गोवा राज्याला मोठा फायदा होईल.

५ गाड्यांचा एकाच दिवशी शुभारंभ

मडगाव-मुंबई सीएसएमटी वंदे भारत एक्सप्रेस, राणी कमलापती (भोपाळ)-इंदूर वंदे भारत एक्सप्रेस, भोपाळ-जबलपूर वंदे भारत एक्स्प्रेस, रांची – पटणा वंदे भारत एक्सप्रेस, धारवाड-बेंगळुरू वंदे भारत एक्स्प्रेस या ५ गाड्यांचे एकाच वेळी भोपाळ येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झेंडा दाखवून लोकार्पण झाले.

हेही वाचा 

Back to top button