रत्नागिरी : खरिपात भाताला मिळणार ६० हजारांचे कर्ज | पुढारी

रत्नागिरी : खरिपात भाताला मिळणार ६० हजारांचे कर्ज

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा :  खरीप हंगामातील अल्पमुदतीच्या शेतीसाठी कर्ज मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. भातासाठी ६० हजार रुपये हेक्टरी कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. संकरित भातासाठी ६५ हजार रुपये निश्चित करण्यात आले आहेत, तर नाचणीसाठी २० हजार रुपये कर्ज मंजूर करण्यात आले आहे.

जिल्हास्तरीय तज्ज्ञ समितीच्या सभेत खेळते भांडवली पीककर्ज दर निश्चिती करण्यात आली आहे. खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी बियाणे, खते खरेदी सुरू केली आहे. त्यामुळे त्यासाठी कर्जाची रक्कम शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणार असून, त्याचा लाभ घेण्याचे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.

बागायतीमध्ये आंबा, काजू, सुपारी, चिकू, कोकम, कागदी लिंबू, पेरू, पपई, आवळा, केळी, काळीमिरी, आले, अननसासाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाते. आंब्यासाठी हेक्टरी सर्वाधिक दोन लाख २० हजार रुपये, तर काजूसाठी एक लाख ६० हजार कर्ज निश्चित करण्यात आले आहे.

जिल्ह्यात भाज्यांचे उत्पादन शेतकरी घेत आहेत. कारली, काकडी, पडवळ, भेंडी, टोमॅटो, घेवडा, शिराळी, दोडकी, वांगी, हिरवी मिरचीसाठी कर्ज दर निश्चित केले आहेत. जिल्ह्यातील अधिकाधिक क्षेत्र पिकाखाली यावे, लागवडीसाठी शेतकऱ्यांना पैशाची चणचण भासू नये, यासाठी खरीप हंगामासाठी कर्ज दर निश्चित करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांनी सातबारा, आठ अ सह जवळच्या बँकेत संपर्क साधावा. राष्ट्रीयीकृत बँका, जिल्हा बँकेतर्फे शेतकऱ्यांना अल्पमुदतीचे कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे.

Back to top button