वंदे भारत एक्‍स्‍प्रेसला राजापुरात थांबा देण्याची मागणी | पुढारी

वंदे भारत एक्‍स्‍प्रेसला राजापुरात थांबा देण्याची मागणी

राजापूर; पुढारी वृत्‍तसेवा कोकणात रेल्वे यावी म्हणुन तत्कालीन राजापूर लोकसभा मतदारसंघाने संसदेत महत्वाची भुमिका बजावली. त्या राजापूरवर मात्र कोकण रेल्वे प्रशासनाने सातत्याने अन्यायच केला आहे. आता वंदे भारत एक्स्प्रेसला राजापुरात थांबा न देण्यात आल्याने तालुकावासीयांच्या पदरी घोर निराशा पडली आहे. कोरे मार्गावरुन धावणारी वंदे भारत एक्स्प्रेस पहाणे एवढेच  तालुकावासीयांच्या नशीबी आले आहे. दरम्यान राजापूर स्थानकात वंदे भारतला थांबा देण्यात यावा अशी जोरदार मागणी तालुक्यातुन वाढू लागली आहे.

कोकण रेल्वे मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन सुरु होणार असुन, रत्नागिरी आणि खेड तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली येथे थांबे मंजुर करण्यात आले आहेत. राजापूरकडे मात्र दुर्लक्ष करण्यात आले आहे.

कोकणात रेल्वे यावी म्हणुन पार्लमेंटमध्ये सातत्याने आवाज उठविणारे तत्कालीन खासदार बॅ. नाथ पै. प्रा मधू दंडवते व त्यानंतर रेल्वेमंत्री म्हणुन कोकण रेल्वेला चांगले दिवस दाखविणारे तत्कालीन केंद्रीय रेल्वेमंत्री ना. सुरेश प्रभू यांनी ज्या लोकसभा मतदारसंघाच्या नावाने प्रतिनिधीत्व केले, त्याच राजापूरच्या नावाने या तालुक्यातील एकमेव असलेल्या राजापूर रेल्‍वे स्थानकावर मात्र कोरे प्रशासनाने अन्यायच केला आहे. मुंबईकडे जाणाऱ्या कोकणकन्या, मांडवी आणि तुतार या एक्स्प्रेससह दिवा – सावंतवाडी पॅसेंजर याच गाड्यांना राजापुरात थांबे आहेत. हे वगळता दक्षीणेसह दिल्ली, गुजरात, उत्तराखंड, पंजाब, राजस्थान आदी भागांकडे जाणाऱ्या गाड्यांना येथे अजुनही थांबे देण्यात आलेले नाहीत. हंगामी काळात कोरे मार्गावर ज्या नवीन गाड्या सोडल्या जातात, त्या गाड्यांना अपवादानेच राजापुरात थांबे दिले जातात. हे गेल्या काही वर्षातील राजापूर रोड स्थानकाचे चित्र आहे.

जिल्ह्यत केवळ राजापूर तालुका वगळता उर्वरीत तालुक्यांतील पोस्टात रेल्वे तिकीट आरक्षणाची सुविधा यापुर्वीच देण्यात आल्या आहेत. केवळ आणि केवळ राजापूरवरच अन्याय होत आला आहे आणि आता देशात सध्या जोरदार बोलबाला असलेल्या आणि सर्वांचे खास आकर्षण ठरलेली वंदे भारत ही ट्रेन कोरे मार्गावर सुरु होत आहे. काही तांत्रिक अडचणीमुळे ती आज (शनिवारी) सुरु झाली नाही. या गाडीला जिल्ह्यात रत्नागिरीशिवाय खेडला थांबा देण्यात आला आहे. त्यामुळे त्या परीसरातील रेल्वे प्रवाशांत जबरदस्त उत्साह संचारला असतानाच जिल्ह्यात चिपळुणसह राजापूरला थांबे नसल्याने या तालुक्यातील जनता प्रचंड नाराज झाली आहे.

आपल्या भागातुन धावणारी वंदे भारत ही गाडी केवळ बघण्याचे काम आता करावे लागणार आहे. ही धावणारी गाडी राजापुरात थांबणार कधी? असे खोचक व तेवढेच संतप्त सवाल आता जनतेतुन विचारले जावू लागले आहेत.

विस्ताराने फार मोठा असलेल्या राजापूर तालुक्यासाठी राजापूर हे एकमेव परीपुर्ण रेल्वेस्थानक आहे, तर सौदळ हे हॉल्ट स्टेशन आहे. तालुक्यातील महत्वपुर्ण अशा या स्थानकात लांबपल्ल्यांच्या गाड्यांना थांबे मिळणे अवश्यक आहे. कारण देशाच्या कर्नाटक .. राजस्थान .. आंध्रप्रदेश .. तेलांगणा .. केरळ, गुजरात आदी राज्यातून तालुक्यात उदरनिर्वाहासाठी येत असतात. त्यामुळे लांबपल्ल्याच्या गाड्यांना राजापूरात थांबे मिळणे अपेक्षीत आहे. कोरे प्रशासनाने मात्र राजापूर रोड स्थानकाकडे दुर्लक्ष करुन अन्यायच केला आहे. कोरे मार्गावर नव्याने सुरु होणाऱ्या वंदे भारत गाडीला राजापुरात थांबा देवुन कोरे प्रशासनाने राजापूरवरचा अन्याय दूर करावा अशी मागणी आता जनतेतून केली जात आहे.

ठळक मागण्या 

*राजापूर रोड रेल्वे स्थानक खोलगट परीसरात असल्याने प्रवाशांना ये-जा करण्यासाठी सरकते जीन्याची व्यवस्था करावी.
*जनशताब्दी एक्स्प्रेसला राजापूरात थांबा मिळावा
*ऱाजापूर पोस्ट कार्यालयात आरक्षण व्यवस्था सुरु व्हावी
*लांब पल्ल्यांच्या गाड्यांना राजापुरात थांबे मिळावेत
*लांब पल्ल्याच्या गाड्या पकडण्यासाठी रत्नागिरी किंवा कणकवली, कुडाळला जावे लागते.

हेही वाचा : 

Back to top button