सिंधुदुर्ग : चोर समजून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिका-यांवर हल्ला | पुढारी

सिंधुदुर्ग : चोर समजून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिका-यांवर हल्ला

बांदा : पुढारी वृत्तसेवा

गोव्यातील पेडणे तालुक्यात सरंबळ येथे मंगळवारी रात्री १ वाजण्याच्या सुमारास खासगी वाहनातून गेलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या (मुंबई) भरारी पथकातील अधिकारी व कर्मचारी यांच्यावर स्थानिकांकडून चोर-लुटेरे समजून प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. यामध्ये दोघे कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत पेडणे पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात सिंधुदुर्ग जिल्हा उत्पादन शुल्क खात्याचे वरिष्ठ अधिकारी गोव्यात दाखल झाले आहेत.

याबाबत पेडणे येथील ग्रामस्थांकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी की, मुंबई येथील भरारी पथक आयुक्त कांतीलाल उमप यांच्या मार्गदर्शनाखाली गोवा हद्दीत तपास काम करण्यासाठी गेले असल्याचे समजते, रात्री उशिराची वेळ असल्याने पथक खासगी वाहनातून गेले होते. या घटनेत उत्पादन शुल्क विभागाचे कर्मचारी व स्थानिक ग्रामस्थ यांच्यात बाचाबाची झाली.यावेळी ग्रामस्थांकडून ओळखपत्राची मागणी करण्यात आली मात्र ते देण्यासाठी टाळाटाळ केल्याने त्याचे पर्यवसान पुढे हाणामारीत झाल्याने दोन कर्मचारी गंभीर जखमी झालेत.

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मुंबई येथील भरारी पथक मंगळवारी रात्री कारवाई करण्यासाठी पेडणे तालुक्यात दाखल झाले, मात्र त्यांच्यासोबत खासगी वाहन असल्याने व चौकशी करत असल्याने स्थानिकांना चोर किंवा लुटेरे असल्याचा संशय आला. ग्रामस्थांनी पथकातील कर्मचाऱ्यांकडे ओळखपत्र मागितले. मात्र कर्मचाऱ्यांनी ओळखपत्र न दाखविल्याने जोरदार बाचाबाची झाली. ग्रामस्थांनी पथकातील अधिकारी व कर्मचारी यांचा काळोखात चोप काढला. तसेच पथकासोबत असलेल्या खासगी चारचाकीची काच देखील फोडण्यात आली.

या झटापटीत दोन कर्मचाऱ्यांना गंभीर दुखापत झाली. यातील एका गंभीर कर्मचाऱ्यावर गोवा-बांबोळी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर दुसऱ्या गंभीर जखमी झालेल्या कर्मचाऱ्याला अधिक उपचारासाठी पुणे येथे पाठवण्यात आल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले आहे. याबाबत पेडणे पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी अज्ञात विरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र याबाबत अधिकृत माहिती देण्यात आली नसून ग्रामस्थांन कडून सांगण्यात आलेली माहिती तसेच पेडणे पोलीस ठाण्यात देण्यात आलेली माहिती यात किती खरे आहे याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

अधिक माहितीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

Back to top button