भरत जाधव न आल्याने सांस्कृतिक चळवळ थांबणार नाही : उदय सामंत | पुढारी

भरत जाधव न आल्याने सांस्कृतिक चळवळ थांबणार नाही : उदय सामंत

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा :  रत्नागिरी येथील नाट्यगृहात आपण पुन्हा पाय ठेवणार नाही, असे सांगत प्रेक्षकांची जाहीर माफी मागणाऱ्या भरत जाधव यांच्या वक्तव्यावर पालकमंत्री उदय सामंत यांची पहिल्यांदाच मंगळवारी मोठी प्रतिक्रिया आली आहे. भरत जाधव यांनी या गोष्टीचे नाहक भांडवल करत त्याचा इव्हेंट करायचा की, एपिसोड करायचा, हा त्यांचा प्रश्न आहे, असा टोला पालकमंत्री उदय सामंत यांनी लगावला आहे. भरत जाधव न आल्यामुळे सांस्कृतिक चळवळ काही थांबणार नाही, अशा शब्दात पालकमंत्री उदय सामंत यांनी भरत जाधव यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.

दि. २५ मे रोजी आयोजित शासन आपल्या दारी उपक्रमाबाबत माहिती देण्याकरता मंगळवारी सायंकाळी आयोजित पत्रकार परिषदेत पालकमंत्री उदय सामंत रत्नागिरी येथे बोलत होते. स्वा. सावरकर नाट्यगृहात कोणत्या त्रुटी असतील तर त्या नक्कीच दूर केल्या जातील, असेही पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रम किती वेळ चालवायचा हा संयोजकांचा विषय आहे. भरत जाधव यांच्या नाटकाच्या आधी तीन दिवस मी त्याच ठिकाणी केंद्रीय मंत्र्यांबरोबर कार्यक्रमासाठी होतो त्या वेळेला एसीचा कोणताही त्रास आम्हाला झाला नाही असेही ते म्हणाले.

Back to top button