रत्नागिरी जिल्ह्यात आज रेड अ‍ॅलर्ट | पुढारी

रत्नागिरी जिल्ह्यात आज रेड अ‍ॅलर्ट

रत्नागिरी/पुणे ; पुढारी वृत्तसेवा : मागील पंधरा दिवस दडी मारलेल्या पावसाने हवामान खात्याच्या इशार्‍यानुसार शनिवारी रात्री दमदार पुनरागमन केले. रत्नागिरी जिल्ह्यात सर्वत्र रात्रभर पाऊस झाला. जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमध्ये 38 च्या सरासरीने 342 मि.मी. पाऊस पडला.

आगामी चारही दिवस मुंबई, ठाणे, कोल्हापूर, सातारा, पुणे या शहरांसह संपूर्ण कोकणाला मुसळधार पावसाचा, तर रत्नागिरी जिल्ह्यातदेखील रेड अ‍ॅलर्टसह शहराला सोमवारी अतिवृष्टीचा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.

गेले दोन आठवडे राज्यात मान्सूनने ओढ दिली होती. मात्र, रविवारी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे.

त्यामुळे दि. 12 ते 15 जुलैदरम्यान मुंबई, ठाणे, कोल्हापूर, सातारा, पुणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

रविवारी मान्सून सक्रिय झाल्याने कोकण व मध्य महाराष्ट्रातील या प्रमुख शहरांना जोरदार पावसाचा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.मे महिन्यातील तोक्ते वादळ आणि वेळेवर आलेला मान्सून यामुळे शेतकर्‍यांनी शेतीची कामे हाती घेतली होती. पेरणीची कामे पूर्ण झाल्यानंतर पावसाने दडी मारली.

मागील 15 दिवस काही ठिकाणी केवळ रिमझिम पाऊस पडला. शेतजमिनी सुकून त्यांना भेगा पडल्या होत्या. शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत असताना मागील दोन दिवसांपासून पाऊस पुन्हा पडू लागला. शनिवारी रात्री सर्वत्रच जोरदार पर्जन्यवृष्टी झाली.

पावसाने झोडपले

शनिवार सकाळ ते रविवार सकाळ या चोविस तासात गुहागरला पावसाने झोडपले. या कालावधित तब्बल 72.90 मिमी पाऊस कोसळला. त्या खालोखाल रत्नागिरी 51 मिमी पावसाची नोंद झाली.

संगमेश्वरमध्ये 41 मि.मी., राजापुरात 40.80, मंडणगडात 38.90, लांजात 39.30, चिपळूण 23.50, दापोली 22.90, तर खेड तालुक्यात 11.30 मिमी पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात आतापर्यंत 1091.41 च्या सरासरीने एकूण 9822.70 मिमी पाऊस पडला. गतवर्षी याच कालावधीत 975.13 च्या सरासरीने 8776.21 मिमी पाऊस पडला.

चिपळुणात शहरासह ग्रामीण भागात दुपारनंतर मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. दुपारी अडीच वाजल्यापासून पावसाची संततधार सुरू झाली आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग सुखावला असून पावसाअभावी अनेक शेतकर्‍यांच्या डोंगर उतारावरील भात लावणीची कामे रखडली होती तर काही ठिकाणी भात शेती उन्हामुळे पिवळी पडू लागली होती. मात्र, आता पाऊस सुरू झाल्याने भात शेती वाचली आहे.

चिपळूण शहरात दुपारी अडीच वाजल्यापासून सायंकाळी उशिरापर्यंत पावसाची संततधार सुरू असल्यामुळे नद्या-नाल्यांना पुन्हा एकदा पाणी आले. या पावसामुळे कोठेही नुकसान झाल्याचे वृत्त नाही. मात्र,आता रखडलेली लावणीची कामे पुन्हा एकदा मार्गी लागणार आहेत. त्यामुळे शेतकरी वर्ग सुखावला आहे.

Back to top button