परशुराम घाटात दरड कोसळून महामार्गावरील वाहतूक विस्कळीत | पुढारी

परशुराम घाटात दरड कोसळून महामार्गावरील वाहतूक विस्कळीत

खेड ; पुढारी वृत्तसेवा : मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटात रविवारी दि. 11 रोजी सायंकाळी 6 वा. सुमारास रस्त्यावर दरड कोसळून वाहतूक विस्कळीत झाली. या घटनेनंतर दीर्घकाळपर्यंत महामार्ग चौपदरीकरण कामाचा ठेका घेतलेल्या कंपनीने याकडे दुर्लक्ष केल्याने वाहनचालकांनी संताप व्यक्त केला.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटात रविवारी दि. 11 रोजी नजीकच्या डोंगरावरील माती रस्त्यावर आल्याने महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली. परशुराम येथील घाटात सध्या रस्ता रुंदीकरणाचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. याच ठिकाणी गेल्या दोन वर्षांपासून रस्ता रुंदीकरण करताना दरड कोसळणे, रस्त्याशेजारी असणारी माती रस्त्यावर येणे असे प्रकार घडत असल्याने नियमित पावसाळ्यात या ठिकाणची वाहतूक ठप्प होते.

मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू असताना या घाटातील रस्ता रुंदीकरण कामाचा ठेका असलेल्या कंपनीने वाहतूक सुरळीत सुरू राहील, याची खबरदारी घेणे गरजेचे आहे. रविवारी सायंकाळी परशुराम घाटात दरड माती रस्त्यावर येऊन देखील संबंधित ठेकेदार कंपनीच्या अधिकार्‍यांनी घटनास्थळी तातडीने पोहोचण्याचे स्वारस्य दाखवले नाही. महामार्ग चौपदरीकरण कधीही होऊ द्या पण तो पर्यंत रहदारीसाठी रस्ता सुस्थितीत ठेवा, अशी मागणी जनतेतून होत आहे.

रविवारी सायंकाळी दरड कोसळल्याने फटका बसलेल्या वाहन चालक तसेच वाहनांमधील प्रवाशांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. दरड कोसळलेल्या ठिकाणाहून वाहन अत्यंत हळू वेगाने पुढे नेण्यात आल्याने महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

Back to top button