शासकीय कर्मचार्‍यांच्या बदल्या आता ऑनलाईन; सामान्य प्रशासन विभागाकडून अ‍ॅपची निर्मिती | पुढारी

शासकीय कर्मचार्‍यांच्या बदल्या आता ऑनलाईन; सामान्य प्रशासन विभागाकडून अ‍ॅपची निर्मिती

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा :  शासकीय कर्मचार्‍यांच्या बदल्या आता ऑनलाईन करण्यात येणार आहेत. ऑनलाईन माध्यमातून बदल्या करण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाकडून विशेष अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून प्रायोगिक तत्त्वावर सार्वजनिक आरोग्य विभागातील ऑनलाईन बदल्या होणार आहेत. तसेच यावरील हरकती आणि आक्षेपाचे निरसनही या अ‍ॅपद्वारेच करण्यात येणार आहे.

शासकीय कर्मचार्‍यांच्या बदली प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आता बदली या अ‍ॅपचा वापर करण्यात येणार आहे. या अ‍ॅपमध्ये कर्मचार्‍यांची माहिती भरण्याबाबत अधिनस्त नियुक्ती प्राधिकारी कार्यालय आणि संस्थांना सूचना दिल्या आहेत. आरोग्य सेवा आयुक्तालयांतर्गत असलेल्या गट-क मध्ये 98 संवर्गातील कर्मचार्‍यांच्या बदल्या या अ‍ॅपद्वारे करण्याचे प्रस्तावित आहे. बदली अ‍ॅपमध्ये संबंधित कर्मचार्‍याची कार्यरत ठिकाणे व रिक्त पदांची माहिती भरण्यात आलेली आहे. तसेच कर्मचार्‍यांना त्यांच्या सुविधेनुसार बदली मिळावी म्हणून अ‍ॅपमध्ये बदलीपात्र कर्मचार्‍यांची ज्येष्ठता सूची, तसेच त्यांच्या अर्जाविषयी आक्षेप नोंदविण्याची सोय करण्यात आली आहे.

बदली अ‍ॅपमध्ये कर्मचारी स्वतः किंवा संस्थेमार्फत अर्ज करू शकतील. कर्मचार्‍यांनी बदलीसाठी ऑनलाईन अर्ज केल्यानंतर उपसंचालक स्तरावर त्यांची माहिती तपासण्यात येणार आहे. अर्ज निश्चिती झाल्यानंतर कर्मचार्‍यांना बदलीचे आदेश अ‍ॅपद्वारे त्वरित मिळण्यास मदत होणार आहे. त्यामुळे बदली अ‍ॅपद्वारे बदली प्रक्रिया राबविल्यास त्याचा कर्मचार्‍यांना लाभ होणार आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून प्राथमिक स्तरावर प्रायोगिक तत्त्वावर सार्वजनिक आरोग्य विभागातील बदली प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यानंतर अन्यविभागातील बदल्यातही ही प्रक्रिया सक्रिय करण्यात येणार आहे.

Back to top button