Barsu Refinery Project : बारसूचा सडा अखेर शांत; आंदोलक फिरकलेही नाहीत; माती परीक्षणाचे काम सुरूच | पुढारी

Barsu Refinery Project : बारसूचा सडा अखेर शांत; आंदोलक फिरकलेही नाहीत; माती परीक्षणाचे काम सुरूच

राजापूर: पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील बारसू येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाच्या अनुषंगाने शनिवारी समर्थक आणि विरोधक यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप रंगले. त्यातून वातावरण तापल्याने आंदोलनाची स्थिती काय राहणार, याची उत्सुकता लागून राहिलेली असताना सडा परिसराकडे दुसर्‍या दिवशी रविवारी आंदोलक फारसे फिरकलेले नसल्याने बारसूचा सडा शांत राहिलेला होता. दरम्यान, गेल्या सुमारे बारा-तेरा दिवसांपासून सुरू असलेले माती परीक्षाणाचे काम आजही सुरू होते.

तालुक्यातील बारसू परिसरातील प्रस्तावित रिफायनरीसाठी माती परीक्षणाचे सर्वेक्षण केले जात आहे. त्याला ग्रामस्थांकडून विरोध करण्यात येत आहे. या माती परीक्षणाच्या कामावरून पोलिस आणि आंदोलक यांच्यामध्ये संघर्षही झाला होता. मात्र, त्यानंतरही माती परीक्षणाचे काम सुरू होते.

दरम्यान, जिल्हा प्रशासनाने रिफायनरीच्या अनुषंगाने ग्रामस्थांशी विशेष बैठक घेऊन संवादही साधला होता. या सार्‍या घडामोडी घडत असताना शनिवारी राजापूरच्या विकासासाठी रिफायनरीची आवश्यकता असल्याचे स्पष्ट करीत रिफायनरी झालीच पाहिजे, या मागणीसाठी प्रकल्प समर्थकांनी शनिवारी मोर्चा काढला होता. या मोर्चाच्या माध्यमातून प्रकल्प समर्थकांनी शक्तीप्रदर्शनाही केले होते. त्याचवेळी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही शनिवारी बारसू परिसराला भेट देऊन प्रकल्प विरोधक ग्रामस्थशी संवाद साधला होता. या वेळी त्यांनी शिवसेना लोकांसोबत असून लोकांना प्रकल्प नको असेल तर शिवसेनेचा विरोध अशी, भूमिकाही स्पष्ट केली होती.

या सार्‍या घडामोडींमध्ये रविवारी आंदोलक अधिक आक्रमक होणार की शांत राहणार, याकडे सार्‍यांचे लक्ष लागून राहिले होते. मात्र, बारसू परिसराच्या सडा परिसराकडे फारसे आंदोलक फिरकलेही नाहीत. त्यामुळे शनिवारच्या दिवसभरातील तणावपूर्ण वातावरणानंतर आज बारसू सडा परिसर शांत राहिलेला होता. त्याचवेळी माती परीक्षणाचेही काम सुरळीतपणे सुरु होते. दरम्यान, माती परीक्षणाचे काम सुरु असताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस फौजफाटा कायम तैनात ठेवण्यात आलेला आहे.

Back to top button