बारसू रिफायनरीचा संघर्ष आणखी तीव्र होणार? | पुढारी

बारसू रिफायनरीचा संघर्ष आणखी तीव्र होणार?

राजापूर; पुढारी वृत्तसेवा :  बारसू येथील संघर्षानंतर कोकणात राजकीय घडमोडींना उधाण आले आहे. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतानाच माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी 6 मे रोजी बारसूला जाऊन तेथील आंदोलनकर्त्या जनतेची भेट घेणार असल्याचे जाहीर केल्याने बारसूचा मुद्दा आणखीन तापण्याची चिन्हे आहेत. आठ दिवसांनंतरही बारसू येथे माती परीक्षणाचे काम सुरूच होते. स्थगित करण्यात आलेल्या बारसू येथील आंदोलनाची मुदत सोमवारी संपल्यानंतर नव्याने आंदोलन सुरू होईल की काय? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मागील काही दिवस आंदोलक शांतच होते. त्यामुळे ही वादळापूर्वीची शांतता तर नसेल ना, अशी चर्चा सुरू आहे.

मागील आठ दिवस बारसू येथील प्रस्तावित रिफायनरीवरून मोठे रणकंदन सार्‍या महाराष्ट्रासह देशाने पाहिले. बारसू सड्यावर प्रकल्पाबाबत माती परीक्षणाचे काम सुरू करण्यात आल्यानंतर त्याविरोधात मोठ्या प्रमाणावर प्रकल्प विरोधी आंदोलक एकवटले होते. रात्रंदिवस बारसूच्या सड्यावर आंदोलक ठाण मांडून बसले होते. तर बारसूकडे जाणार्‍या सर्व मार्गांवर पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला होता.

सुरू असलेले काम थांबविण्यासाठी आंदोलक वेगाने प्रयत्न करीत असताना आंदोलक आणि पोलिस प्रशासनादरम्यान संघर्ष झाला होता. त्यातूनच पोलिसांकडून लाठीमार व अश्रुधूर सोडल्याचे आरोप आंदोलकांच्या वतीने करण्यात आले होते. त्यानंतर तीन दिवसांसाठी आंदोलन स्थगित करण्यात आले होते, त्याची मुदत सोमवारी संपली. दरम्यान सोमवारी सायंकाळी उशिरा प्रकल्पस्थळावर आंदोलक जमा होऊ लागले होते. त्यामुळे नव्याने आंदोलन सुरू होणार की काय? अशी शंका व्यक्त होत होती.

कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता, मात्र नंतर प्रकल्पग्रस्त आंदोलक माघारी फिरले होते. मंगळवारी सकाळपासून शांतता होती. दरम्यान, सोमवारी मुंबईत पार पडलेल्या महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभेदरम्यान उध्दव ठाकरे यांनी सहा तारखेला बारसूचा दौरा करणार असल्याचे घोषित केल्याने बारसूवरून सुरू झालेले रणकंदन आणखी वाढले आहे. आता उध्दव ठाकरेंच्या बारसू दौर्‍यावरून राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे सहा मे रोजी बारसू प्रकल्पग्रस्तांना भेटणार आहेत. त्यांचा नियोजित दौरा यशस्वी व्हावा म्हणून ठाकरे गटाकडून जय्यत तयारी सुरू आहे.
मागील काही दिवसांपासून तापलेला बारसूचा मुद्दा पुढील काही दिवस धगधगत राहणार हे निश्चित आहे. नाणारनंतर बारसूकडे सरकलेल्या रिफायनरीचा मुद्दा तेवढाच धगधगू लागला आहे.

उद्धव ठाकरेंच्या भाषणाकडे लक्ष

नाणार येथील रद्द झालेल्या रिफायनरी प्रकल्पाला बारसूसाठी जागा सुचविणारे पत्र महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिले होते. त्या पत्रावर बराच ऊहापोह झाला होता. त्या पत्राबाबत उध्दव ठाकरे यांनी मुंबईतील वज्रमुठ सभेत भूमिका स्पष्ट केली होती. मात्र बारसू येथे ते त्या मुद्द्यावर विस्तृत काय बोलतात त्यावरही राजकीय वर्तुळाचे लक्ष केंद्रीत झाले आहे.

Back to top button