बारसू चौपाटी आहे का फिरायला? .. रामदास कदम यांची उद्धव ठाकरेंवर टीका

खेड; पुढारी वृत्तसेवा : बारसू काय चौपाटी आहे का, पिकनिकला जाताय? बारसूचा प्रस्ताव तुम्हीच पाठवला आणि आता लोकांना भडकवायला आहात का, असा सवाल शिवसेना नेते रामदास कदम यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंंना विचारला आहे. ठाकरेंनी बारसूला जाणारच, अशी भूमिका जाहीर केल्याच्या पार्श्वभूमीवर कदम यांनी मंगळवार, दि. 2 रोजी दै. ‘पुढारी’ सोबत बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले.
महाविकास आघाडीच्या सभेत शिंदे – फडणवीस सरकारवरती टीका करतानाच बारसू रिफायनरी दौर्याची घोषणा केल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यावर शिवसेना नेते रामदास कदम यांनी मंगळवारी तोफ डागली आहे. ते म्हणाले की, बारसूला रिफायनरी व्हावी, यासाठी उद्धव ठाकरे यांनीच केंद्राला प्रस्ताव पाठवला आणि आता बारसूला जाऊन
लोकांना भडकवायच काम देखील उद्धव ठाकरे करणार आहेत.
बारसूला गेलात तर लोक तोंडावर थुंकतील. शरद पवारांना बाप म्हणताय तर त्यांच्याकडून काहीतरी शिका. उद्धव ठाकरे हे दुतोंडी आहेत का, हेच कळत नाही. ठाकरे यांचा हा दुतोंडीपणा सर्वांना माहित आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे हे केवळ दोन वेळाच विधानसभेत गेले. ही माहिती शरद पवार यांनी माध्यमांना सांगितली आहे. त्यामुळे ज्यांना बाप म्हणताय त्यांच्याकडून काही तरी शिका, असा सल्लाही रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे. महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभा म्हणजे फक्त गद्दार गद्दार म्हणण्यासाठी ओरड असून या थयथयाटाला जनता भीक घालणार नाही, असेही रामदास कदम यावेळी म्हणाले.