चला पर्यटनाला : मालवण समुद्रात फ्लाय बोर्डिंग व पॅरा मोटरिंग! | पुढारी

चला पर्यटनाला : मालवण समुद्रात फ्लाय बोर्डिंग व पॅरा मोटरिंग!

मालवण; महेश कदम : उन्हाळी सुट्टीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी सिंधुदुर्ग किनारपट्टीवर देवगड, कुणकेश्वर, वेंगुर्ले व मालवण या ठिकाणी राज्यभरातील पर्यटक विसावत आहेत. जिल्ह्याच्या किनारी परिसरात वॉटर स्पोर्ट, बनाना राईड जेट, स्की पॅरासिलिंग, स्कुबा डायव्हिंग यांसारख्या मनोरंजनाच्या साहसी क्रीडा प्रकाराबरोरच आता मालवण तारकर्ली किनारपट्टीवर पर्यटन व्यावसायिकांनी थायलँड, मलेशिया, दुबई या देशातील धर्तीवर नव्याने सुरू केलेल्या फ्लाय बोर्डिंग व पॅरा मोटरिंग या साहसी क्रीडा प्रकाराने पर्यटकांना भुरळ घातली आहे.

मुलांच्या परीक्षा संपल्याने उन्हाळी सुट्टीनिमित्त सिंधुदुर्ग जिल्हाच्या किनारी परिसरात मुंबई, नाशिक, कोल्हापूर, सांगली, सातारा या राज्यभरातील पर्यटकांचा ताफा पाहावयास मिळत आहे. देवगड, विजयदुर्ग किनार्‍यावर पर्यटक वॉटर स्पोर्टस् व इतर मनोरंजन क्रीडा प्रकारचा आनंद घेत आहेत. वेंगुर्ला-निवती येथे नितळ स्वच्छकिनारी पर्यटक समुद्रात आंघोळ करण्याचा आनंद लुटताना दिसत आहेत. मालवण-दांडी बीच, देवबाग, तारकर्ली, तोंडवळी, तळाशील हे किनारे देखील पर्यटकांनी फुलून गेले आहेत.

पर्यटक मालवणच्या समुद्रातील ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्ग दर्शनासाठी प्रथम पसंती देत असून किल्ला दर्शनासाठी मालवण बंदर जेटीवर पर्यटकांची गर्दी होत आहे. मालवण दांडी, चिवला बीच, तारकर्ली, देवबाग, सुनामी आयलंड आदी ठिकाणी स्कुबा डायव्ेिंहग व विविध वॉटर स्पोर्टस्चा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांनी गर्दी होत आहे. तारकर्ली एमटीडीसी केंद्र, तारकर्ली समुद्र किनारा, देवबाग संगम पॉईंट आदी ठिकाणीही पर्यटक पर्यटनाचा आनंद लुटत आहेत. जेवणासाठी विविध हॉटेल्स, रेस्टॉरंट, खानावळी पर्यटकांनी फुलून गेल्या आहेत.

मच्छी जेवणाला पर्यटक पसंती देत आहेत. मालवणची बाजारपेठ व बंदर जेटीसह इतरत्र असलेले विविध वस्तूंचे स्टॉल खाद्यपदार्थची दुकानेही पर्यटकांनी गजबजून गेली आहेत.

सुनामी बेट मोठे आकर्षण

हिंद महासागरात सहा वर्षांपूर्वी सुनामी आली होती. यात पश्चिम किनारपट्टीवरील देवबाग व भोगवेच्या मध्ये अचानक वाळूचे एक बेट तयार झाले. त्यालाच सुनामी बेट असे म्हटले जाते. जेव्हापासून हे बेट तयार झाले तेव्हापासून पर्यटकांचे ते सर्वात मोठे आकर्षण बनले आहे. या बेटावर जाण्यासाठी देवबाग व तारकर्ली येथून बोटिंगची सुविधा आहे.

कसे जाल

कोल्हापूरहून मालवणला जाण्यासाठी कोल्हापूर-गगनबावडामार्गे 165 किमी अंतर आहे; तर फोंडाघाट मार्गाने 160 किमी अंतर आहे. तारकर्ली बीचवरून देवबागला बोटीने जाता येते. मुंबईहून रेल्वेने कणकवली, कुडाळ किंवा सिंधुदुर्ग नगरी येथे उतरून खासगी वाहन किंवा एसटीने मालवणला पोहोचता येते. मुंबई ते मालवण हे अंतर 450 किमीचे अंतर आहे.

Back to top button