केरळमधील रेल्वे गाडीतील हल्ला हा नियोजनबद्ध कट | पुढारी

केरळमधील रेल्वे गाडीतील हल्ला हा नियोजनबद्ध कट

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा :  केरळच्या कोझिकोड येथे अलप्पुझाकन्नूर एक्झिक्युटिव्ह एक्स्प्रेस ट्रेनमध्ये आग लावून तिघांचे बळी घेणार्‍या शाहरुख सैफी याने संपूर्ण नियोजन करून हल्ला केला आहे, आसा दावा केरळचे एडीजीपी अजित कुमार यांनी केला आहे. आतापर्यंतच्या तपासात हे सिद्ध करण्यासाठी आरोपींविरुद्ध बरेच पुरावे गोळा करण्यात आले असल्याचे अजित कुमार यांनी स्पष्ट केले आहे. हल्ला केल्यानंतर रत्नागिरीत येण्याचा त्याचा प्लॅनचाच भाग असल्याचे यावरुन पुढे आले आहे.

दि. 2 एप्रिल रोजी केरळच्या कोझिकोड येथे अलप्पुझाकन्नूर एक्झिक्युटिव्ह एक्स्प्रेस ट्रेनच्या डब्यात एक अज्ञात व्यक्तीने आग लावली होती. त्यामुळे 3 जणांचा मृत्यू झाला तर 9 जण जखमी झाले आहेत. सीट शेअरिंगवरून आरोपींचा सहप्रवाशांसोबत वाद झाल्यानंतर शाहरुख सैफी याने केमिकलने भरलेली बाटली फेकली आणि कोचमध्ये आग लागली होती.

कोझिकोड ट्रेन जाळपोळ प्रकरणातील आरोपी शाहरुख सैफी याला रत्नागिरीतील रेल्वे स्थानिकातून अटक केली होती. त्याची चौकशी सुरु असताना आता धक्कादायक खुलासे पुढे येत आहेत. शाहरुखने संपूर्ण नियोजन करून हल्ला केला. त्यानंतर तो रत्नागिरीच्या दिशेने पळाला होता.

आरोपी शाहरुख सैफा हा कट्टरपंथी आहे. तो झाकीर नाईक आणि इसरार अहमद सारख्या मुस्लिम धर्मोपदेशकांचे व्हिडिओ पाहत असे. या हल्ल्याचे पूर्ण नियोजन होते. मात्र, तो कोणत्या संघटनेशी संबंधित आहे, असे सध्या तरी म्हणता येणार नाही. शाहरुख सैफीला स्थानिक पाठिंबा मिळाला होता का, याचाही तपास करत असल्याचे एडीजीपी अजित कुमार यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.

आतापर्यंत केलेल्या वैज्ञानिक तपासणीत सर्व पुरावे गोळा करण्यात आले आहेत. हा तपास अगदी कमी कालावधीत झाला आहे. यादरम्यान गुन्ह्याचे पुरावेही गोळा करण्यात आल्याचे एडीजीपी यांनी सांगितले. या प्रकरणाशी संबंधित इतर बाबींवर अधिक तपास केला पाहिजे आणि हे असेच एक प्रकरण आहे, ज्याची व्यापक चौकशी होणे गरजेचे आहे असे एडीजीपी अजित कुमार यांनी सांगितले.

Back to top button