

अलिबाग; जयंत धुळप : उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्या आहेत. अभ्यासाचा ताणतणाव घालवण्यासाठी मनसोक्त हिंडायचे आहे. विद्यार्थी, शिक्षक आणि इतर सर्वांनाच कोकणातील नारळ, सुपारीच्या बागांनी फुललेले समुद्रकिनारे विशेष खुणावत आहेत. पर्यटकांना गाईड करणारी वृत्तमालिका पुढारीत आजपासून…………
कोकणातील सागरी किनारे आणि सागरी किल्ले आकाशातून पाहाण्याची पर्यटांची इच्छा यंदा पूर्ण होणार आहे. आकाशात भ्रमण करून किल्ले आणि समुद्र पहाण्याची संधी आता अलिबाग जवळ वरसोली बीच आणि मुरुड बीच येथेे आयोजित करण्यात येत असलेल्या एरोस्पोर्टस् फेस्टिव्हलमध्ये पर्यटकांना प्रथमच मिळणार आहे.
पॅराशूट जोडणी असलेल्या छोट्या विमानात बसून पर्यटकांना किल्ले आणि समुद्र किनार्यांचे विलोभनीय दर्शन घेता येणार आहे. या विमानात बसण्यासाठी वरसोली बीच व मुरुड बीच येथे ही सोय उपलब्ध झालेली आहे. छोटे विमान याच दोन्ही बीचवरूनच उड्डाण करणार आहे आणि याच बीचवर उतरणार आहे. मुरुड बीच येथे येत्या 22 एप्रिलपासून तर अलिबाग जवळच्या वरसोली बीच येथे येत्या 25 एप्रिलपासून एरोस्पोर्ट्स फेस्टिव्हल अंतर्गत पर्यटकांना ही अनोखी संधी प्राप्त होणार आहे. याकरिता अत्यंत माफक असे शुल्क राहाणार आहे.
जगभरातून दर्जेदार पर्यटक कोकणात यायचे असतील तर त्यांना हव्या असलेल्या जागतिक दर्जाच्या पर्यटन सुविधा कोकणात निर्माण व्हायला हव्यात. कोकणातील इतिहास, संस्कृती, निसर्ग, समुद्रकिनारे, बॅक वॉटर्स आणि हे सर्व अनुभवण्यासाठी आधुनिक संसाधनांचा उपयोग करायला हवा. याच सर्व गोष्टी विचारात घेऊन कोकणातील हा पहिला एरोस्पोर्टस् फेस्टिव्हल आयोजित करण्यात येत आहे.
एरोस्पोर्टस् समुद्रकिनार्यावर अनुभवता यावा, ही व्यवस्था कोकण पर्यटन उद्योग संघाच्या माध्यमातून निर्माण करण्यात येत आहे. या उपक्रमास महाराष्ट्र राज्याचे पर्यटन संचानालय आणि महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डरचे विशेष सहकार्य लाभले आहे. भारताबाहेर दुबईमध्ये अशा स्वरूपाचा उपक्रम चालवणारे गोविंद येवले आता यंदा कोकणात एरोस्पोर्टस् उपक्रम राबवणार असल्याने आता कोकणातील या किनार्यांवर पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.
अलिबाग तालुक्यात वरसोली समुद्रकिनार्यावर पॅराशूट सलग्न छोट्या विमानाची यशस्वी चाचणी नुकतीच करण्यात आली. वरसोलीचे माजी सरपंच आणि कल्पक पर्यटन उद्योजक मिलिंद कवळे, मुरुडमधील प्रकाश सरपाटील यांच्या बरोबरच येथील ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य आदी सर्वजण अतिशय उत्साहाने प्रथमच होत असलेल्या या उपक्रमात सहभागी होत आहेत. स्थानिक रोजगार निर्मितीच्या द़ृष्टीने आणि पर्यटन उद्योग वाढीच्या द़ृष्टीने गावकर्यांचा याला उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे. साहसी पर्यटनामध्ये मोठे काम उभारणारे कोकणातील उद्योजक महेश सानप, मंगेश कोयंडे, प्रसाद चौलकर हे देखील उपक्रमात सहभागी होत असल्याची माहिती या निमीत्ताने कोकण पर्यटन उद्योग संघाचे समन्वयक संजय यादवराव यांनी दिली आहे.