विमानाचे ऐतिहासिक लॅण्डिंग…जुगलबंदी आणि ‘तिखट’ पेढा! | पुढारी

विमानाचे ऐतिहासिक लॅण्डिंग...जुगलबंदी आणि ‘तिखट’ पेढा!

सिंधुदुर्ग : प्रमोद म्हाडगुत

मालवणी माणसाच्या पिढ्यान्पिढ्यांनी पाहिलेले विमानतळाचे स्वप्न अखेर शनिवारी सत्यात उतरले. एकापाठोपाठ अशा तीन विमानांनी चिपीच्या माळरानावरील उभारलेल्या देखण्या विमानतळाच्या धावपट्टीवर ऐतिहासिक लॅण्डींग केले. या सोहळ्यात सध्याचे कट्टर राजकीय विरोधक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीयमंत्री नारायण राणे एकाच व्यासपीठावर आल्यामुळे या कार्यक्रमाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले होते. अपेक्षेप्रमाणे राणे यांनी शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांवर भर व्यासपीठावर मुख्यमंत्र्यांच्या समोरच गंभीर आरोप केले आणि त्या आरोपानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनेक मुद्यांवर राणे यांची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला. ठाकरे आणि राणे यांची जुगलबंदी इतकी रंगली की या ऐतिहासिक सोहळ्याची आठवण पुढील अनेक पिढ्या काढत राहतील. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी मुंबई ते सिंधुदुर्ग असा या विमानाने प्रवास करताना त्याच विमानात असलेल्या केंद्रीयमंत्री नारायण राणे यांना गोड पेढा दिला खरा, परंतु प्रत्यक्ष सोहळ्यात या पेढ्याच्या गोडव्याआडून राजकीय तिखटपणाचीच चर्चा अधिक झाली.

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासातील शनिवारचा दिवस सुवर्णक्षण होता. त्यामुळे संपूर्ण जिल्हावासीयांचे लक्ष या सोहळ्याकडे लागले होते. एक नव्हे तर तीन विमाने शनिवारी या विमानतळावर उतरली. महाराष्ट्राचे लक्ष या सोहळ्याकडे यासाठी लागले होते की मुख्यमंत्र्यांसहित महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांचे नेते आणि भाजपचे नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे या कार्यक्रमाला एकाच व्यासपीठावर येणार होते. तसे ते आलेही आणि व्हायचे ते झालेही…

निमंत्रितांसाठी कार्यक्रम होता. त्यामुळे टर्मिनल हॉलच्या सभागृहात जितके लोक बसतील तेवढेच पास देण्यात आले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राणे एकाच विमानातून येतील अशी अटकळ बांधली जात होती. परंतु मुख्यमंत्री स्वतंत्र विमानाने उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना घेऊन मुंबईतून सिंधुदुर्गात आले. राणे आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासहित राज्य सरकारमधील अनेक मंत्री, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक आणि भाजपचे नेतेमंडळी दुसर्‍या विमानातून आली. विशेष म्हणजे याच विमानातून भाजपचे आणि शिवसेनेचे अनेक स्थानिक पदाधिकार्‍यांनी विमान प्रवास केला. त्यात जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. संजना सावंत, उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांच्यासहित अनेकांचा समावेश होता.

जेव्हा कार्यक्रम सुरू झाला तेव्हा शिवसेना आणि भाजपकडून आपापल्या नेत्यांच्या ‘आगे बढो’ च्या घोषणा सुरू झाल्या. दरम्यान, ठाकरे आणि राणे यांनी एकमेकांना नमस्कारही केला. ठाकरे यांनी राणे यांना काही सांगण्याचाही प्रयत्न केला. त्याचा उल्लेख राणे यांनी नंतर आपल्या भाषणातही केला.

कार्यक्रमाची सुरुवात खासदार विनायक राऊत यांच्या सूत्रसंचालनाने झाली. त्यांनी सर्वांचे स्वागतही केले. हे स्वागत करताना उद्योगमंत्री सुभाष देसाई हे या विमानतळाचे मालक असल्याचा उल्लेख त्यांनी केला. त्याचवेळी 1992 सालात त्यावेळचे खासदार ब्रिगेडीयर सुधीर सावंत यांनी या विमानतळाची जागा निश्चित केल्याचा उल्लेख केला. सुभाष देसाई यांनी या कामाचे श्रेय खासदार विनायक राऊत यांना दिले. या सगळ्या वक्तव्यांकडे राणे यांचे लक्ष होतेच. त्यामुळे राणे यांनी आपल्या भाषणात राऊत यांच्या सूत्रसंचालनावर आक्षेप नोंदवला. त्याशिवाय विमानतळाचे मालक म्हणजेच आयआरबीचे अध्यक्ष वीरेंद्र म्हैसकर हे बदलले आहेत का? असा खोचक सवाल विचारला. एवढेच नव्हे तर 2009 साली जेव्हा आपण या विमानतळाचे भूमिपूजन केले तेव्हा शिवसेनेच्या ज्या नेत्यांनी विमानतळाला विरोध केला होता तेच आता व्यासपीठावर आहेत असे खासदार विनायक राऊत यांचे नाव न घेता सांगितले. त्यामुळे कार्यक्रमाला गंभीर स्वरुप आले. राणे एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी हायवेच्या कामामध्ये ‘आमचे भागवा’ असे सांगत काहीजण आडवे जातात असा आरोप केला.

सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास आपण केला असा दावाही त्यांनी केला. त्यामुळे सूत्रसंचालन करणारे राऊत काय बोलणार? मुख्यमंत्री आपल्या भाषणात राणे यांना काय उत्तर देणार? याकडे लक्ष लागून राहिले होते. राऊत यांनी पूर्वीप्रमाणेच सूत्रसंचालन फारसे काही न बोलता सुरूच ठेवले. मात्र राणे यांच्या प्रत्येक वक्तव्याचा मुख्यमंत्र्यांनी समाचार घेण्याचा प्रयत्न केला. हा कार्यक्रम आनंदाचा आहे, आदळआपट करण्याचा नाही, चांगल्या कार्यक्रमात काळा टिका लावणार्‍या कोणीतरी असावा लागतो. तोही व्यासपीठावर आहे. कोकणच्या लाल मातीत बाभळीची झाडेही उगवली आहेत त्याला माती काय करणार? सिंधुदुर्ग किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला. पण कुणीतरी म्हणेल मी बांधला. काहीजण इथे मळमळ व्यक्त करण्यासाठी आले आहेत असे टोले राणे यांना लगावताना मुख्यमंत्र्यांनी राणे यांच्यावर काहीवेळा कटाक्षही टाकला. अशा या जुगलबंदीतच या ऐतिहासिक सोहळ्याची सांगता
झाली.

Back to top button